मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी समर्पित आयोगाला
निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदणीची सुविधा
नांदेड (जिमाका), दि. 14 :- औरंगाबाद विभागासाठी समर्पित आयोगाचा भेटीचा कार्यक्रम दिनांक 22 मे 2022 रोजी, सकाळी 9.30 ते 11.30 ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार ज्या नागरीकांना / संस्थाना मा. समर्पित आयोगाची भेट घ्यावयाची आहे अथवा निवेदन द्यावयाचे आहे अशा नागरीकांनी / संस्थांनी त्यांचे / संस्थेचे नाव, पत्ता, दुरध्वनी क्रमांक व ई-मेल इत्यादी माहितीसह नोंदविणे आवश्यक आहे. ही नोंदणी जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक 21 मे 2022 पर्यंत (कार्यालयीन दिवशी, कार्यालयीन वेळेत) इच्छुकांनी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती आणि शहरातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नागरीकांच्या मागास प्रवर्गास (ओबीसी, व्हिजेएनटी) आरक्षण देण्यासाठी मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग गठीत केला आहे. महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्विकारण्यासाठी या समर्पित आयोगाने विभागवार कार्यक्रम जाहीर केला आहे. या समर्पित आयोगाच्या भेटीच्या वेळी आपली मते नागरिकांना वेळेत मांडता यावीत आणि निवेतदन देता यावेत यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात आपल्या नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापूर्वी करावी असे आयोगातर्फे निवेदन करण्यात आले आहे.
नांदेड जिल्हयातील नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड, नगरपरिषद, देगलूर, मुखेड, बिलोली, कुंडलवाडी, धर्माबाद, उमरी, भोकर, मुदखेड, हदगांव, लोहा, कंधार, किनवट, नगरपंचायत नायगाव, अर्धापूर, हिमायतनगर, माहुर या 17 नागरी क्षेत्रासाठी नगरपरिषद प्रशासन विभाग, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे, तसेच ग्रामीण भागासाठी उपजिल्हाधिकारी(सामान्य), जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे कक्ष (हेल्प डेस्क) स्थापन करण्यात आला असून दिनांक 21 मे 2022 पर्यंत (कार्यालयीन दिवशी, कार्यालयीन वेळेत) इच्छुकांनी नोंदणी करणे आवश्यक राहील, असेही आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment