Tuesday, November 20, 2018


गोवर-रुबेला मूक्तीसाठी...
 
-         अनिल आलुरकर
     जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड
           
गोवर-रुबेला या आजारांचे देशातून समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागाने देशभरात गोवर-रुबेला प्रतिबंधक लसीकरणाची मोहिम हाती घेतली आहे. त्याचा एक भाग म्हणजे ही मोहिम महाराष्ट्र राज्यात 27 नोव्हेंबर 2018 पासून सुरु होत आहे. या मोहिमेविषयी ही माहिती.
 
गोवर आणि रुबेला या लहान मुलांना होणाऱ्या आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी देश पातळीवर नियोजनबध्द रीतीने प्रक्रिया सुर करण्यात आली आहे. गोवर आणि रुबेला या दोन्ही आजारावर एमएमआर लसीमुळे प्रतिबंध करता येतो. या रोगांवर मात करण्यासाठी गोवर रुबेला लसीकरण मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत नऊ महिने पूर्ण केलेल्या ते पंधरा वर्षापेक्षा कमी वयोगटातील सर्व बालकांना गोवर रुबेला लसीचा एक डोस देण्यात येईल.
            गोवर हा सर्वांना माहिती असलेला संसर्गजन्य आजार असून या रोगामुळे मुलांमध्ये मृत्यू तसेच अपंगत्व येऊ शकते. रुबेला या आजारामुळे जन्मत: व्यंग असलेली बालके जन्माला येतात. ज्या मुलांना लस मिळालेली नसेल अशा रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 90 टक्केपेक्षा जास्त बालकांना हा आजार संसर्गातून होण्याची शक्यता राहते. रुबेला ज्याला जर्मन मिझल सुध्दा म्हटल्या जाते, हा सौम्य स्वरुपाचा आजार असला तरी गर्भवती मातेस हा आजार झाल्यास तिला व तिच्या बालकांमध्ये गंभीर स्वरुपाची गुंतागुंत याच्यामुळे होऊ शकते. गोवर प्रमाणे रुबेला हा आजार सुद्धा लसीद्वारे नियंत्रित केला जाऊ शकतो.
           
गोवर आजाराच्या लक्षणामध्ये ताप, खोकला आणि अंगावर लालसर ठिपके दिसून येतात. गोवरामुळे प्रतिकारक शक्ती कमी होते आणि त्यामुळे निमोनिया, आंधळेपणा, डायरिया आणि मेंदूज्वरासारखे आजार उदभवतात. पाच वर्षाच्या आतील बालकांमध्ये या गुंतागुंतीचे प्रमाण खूप जास्त असते. या आजारातून बालक दुरुस्त झाले तरी काही प्रमाणात त्यांच्यात अपंगत्व राहते. या आजारामुळे देशात दरवर्षी सुमारे 49200 बालके गोवरामुळे मृत्यूमूखी पडतात. आणि महत्वाचे म्हणजे हा आजार गोवर लसीचे दोन डोस देऊन पूर्णपणे थांबवू शकतो.
            गर्भवती मातेस पहिल्या तिमाहीत रुबेला हा आजार झाल्यास बालकांमध्ये कंजेनायटल रुबेला सिंड्रोम हा भयंकर आजार होण्याची दाट शक्यता असते. या आजारात बालकांमध्ये वेगवेगळ्या जन्मत:च व्यंग असतात. त्यामध्ये प्रामुख्याने ह्रदयाचे आजार तसेच बहिरेपणा किंवा आंधळेपणा येऊ शकतो. दरवर्षी एक लाखापेक्षा जास्त कंजेनायटल रुबेल सिंड्रोम ( सी.आर.एस.) लस आजाराची बालके जन्माला येतात. जन्मत:च व्यंग घेऊन असलेल्या या बालकांमुळे संपूर्ण कुटूंब मानसिक, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या कमजोर होऊन जाते. गोवर प्रमाणे रुबेला हा आजार सुध्दा लसीद्वारे नियंत्रित केला जाऊ शकतो. ज्यामध्ये रुबेलाची लस किंवा गोवर मम्पस रुबेला लस (एमएमआर) चा वापर केला जातो.
            गोवर व रुबेलाचे प्रगत राष्ट्रांमधून सन 2002 सालीच उच्चाटन झाले आहे. परंतु अशा आजाराचा रुग्ण त्या देशात जातो आणि त्याठिकाणी लस न मिळालेला बालक अशा रुग्णांच्या संपर्कात येतो, तेव्हा त्याला हा असा आजार होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे नियमित लसीकरण अतिशय आवश्यक आहे. गोवर, रुबेला आणि कंजेनायटल रुबेला सिंड्रोम (सी.आर.एस.) हे आपण थांबवू शकतो. त्याकरिता नियमित लसीकरण अतिशय महत्वाचे आहे. परंतु त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. नियमित लसीकरणाच्या माध्यमातून आपण हे प्रमाण बरेच कमी करु शकलो आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार गोवर आणि रुबेला लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत सूक्ष्म नियोजन केले जात आहे. शाळांमध्ये पालक सभा घेऊन या मोहिमेची माहिती दिली जात आहे. पालकसभेत आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय अधिकारी पालकांनी उपस्थत केलेल्या विविध शंकांचे निरसन करुन त्यांना या लसीकरणाची उपयोगिता व महत्व पटवून देत आहेत.
गोवर लसीप्रमाणे एमएमआर लसीचे दोन डोस दिले जातात. गोवर रुबेला या लसीचा अंतर्भाव नोव्हेंबर 2018 पासून शासकीय लसीकरण कार्यक्रमात करण्यात येईल. परंतु यापूर्वी गोवर रुबेला लसीची मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येईल. या मोहिमेत 9 महिने पूर्ण ते 15 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील सर्व बालकांना गोवर रुबेला लसीचा एक डोस देण्यात येईल. ही लस इंजेक्शनद्वारे उजव्या दंडात (सब क्युट्यानियस) देण्यात येईल. बालकांना या लसीचा डोस पूर्वी दिलेला असेल तरीही मोहिमेतील जादाचा डोस देणे आवश्यक आहे. जादाचा डोस दिल्याने बालकाला कोणतेही नुकसान होत नाही. ही मोहीम 27 नोव्हेंबर पासून राबविण्यास सुरुवात होणार असून सुमारे पाच आठवडे प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना डोस देण्यात येईल. त्यानंतर दोन आठवडे शाळेत न जाणाऱ्या विद्यार्थ्यांना डोस देण्यात येईल. पाचव्या आठवड्यात राहिलेल्या सर्व मुलांना डोस देण्यात येईल.
लोकांचे स्वास्थ्य सुधारण्यासाठी भारत सरकारने एमआर कॅम्पेन सुरु केली आहे. या मोहिमेमध्ये भारतातील नऊ महिने ते पंधरा वर्षाखालील 40 कोटींपेक्षा जास्त बालकांना लस द्यायची आहे. 2017 मध्ये सुरु झालेली ही मोहीम दोन वर्ष राबवायची आहे.
या लसीचा कोणताही दुष्परिणाम नाही. अगदी नगण्य स्वरुपात एखाद्या मुलांना किरकोळ दुष्परिणाम होऊ शकतो. त्यावर तातडीने इलाज केल्यास कोणताही धोका नाही. ही लस घेतल्यावर मुलांना गोवर व रुबेला या दोन्ही रोगांपासून बचाव होईल. या मोहिमेत सर्वांनी सहभागी होऊन आपल्या 9 महिने पूर्ण ते 15 वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना एमआर लसीचा डोस देऊन त्यांना गोवर व रुबेला आजारांपासून मुक्त  करावे.
यासाठी प्रत्येक पालकांनी पुढाकार घेण्याची गरज असून आपल्या शाळेत, घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करुन पात्र मुला-मुलींना एमआरची लस देण्यास पुढे यावे. आपल्या परिसरातील पात्र बालकांनाही लस मिळाल्याची खात्री एक सुजान नागरिक म्हणून पुर्ण करा.
 
 

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...