Monday, May 4, 2020


नांदेड जिल्हा न्यायीक विभागात ;
कोविड 19 संसर्गाच्या पार्श्वभुमीवर
मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे अनुपालन करा
    प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकिया   
नांदेड, (जिमाका) दि. 4 :- सध्या उद्भवलेल्या कोविड 19 या साथीच्या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभुमीवर मा. उच्च न्यायालयाने 4 मे 2020 रोजी परिपत्रकान्वये विविध मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार, वकील, न्यायाधीश यांनी नमूद मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे अनुपालन करुन सहकार्य करावे, असे प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकिया यांनी सूचित केले आहे.
प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकिया यांनी नांदेड जिल्हा न्यायीक विभागातील सर्व आस्थापना प्रमुख, न्यायीक अधिकारी यांना पुढे असे सुचीत केले आहे की, त्यांनी आपआपल्या न्यायालयात मा. उच्च न्यायालयाच्या नमूद मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे अनुपालन तात्काळ प्रभावाने होण्याच्यादृष्टीने उचित कार्यवाही लगेच करावी.  पुढील सुचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याची दक्षता घेण्याचे त्यांनी सांगितले आहे.
न्यायालयात प्रवेश करणाऱ्या सर्व विधीज्ञ, पक्षकार व कर्मचाऱ्यांनी आपल्या मोबाईल फोनमध्ये आरोग्य सेतू ॲप स्थापित करण्याच्या सुचना दयाव्यात. न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ न्यायालयात प्रवेश करणाऱ्या विधिज्ञ, पक्षकारांचे ओळखपत्र तपासून त्या सर्वांची एका स्वतंत्र नोंदवहीत नोंद केली जाण्याची व्यवस्था करावी. चेहरा व्यवस्थीतरित्या झाकला जाईल, अशा प्रकारे मास्क अथवा रुमालाने बांधलेला असल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीस प्रवेश दिला जाऊ नये. न्यायदालनामध्ये शिरण्यापूर्वी हात पाण्याने व सॅनिटायझरने स्वच्छ धुवून घ्यावे. प्रस्तुत परिपत्रक आपल्या मुख्यालयी असलेल्या स्थानिक अधिवक्ता संघाच्या निदर्शनास आणून दयावे. तसेच दिनाक शनिवार 16 मे 2020 पर्यंत फक्त अत्यंत तातडीची व रिमांडची प्रकरणे दुपारी 12 ते 2 या कालावधीत घेतली जातील. न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार, वकील आणी न्यायाधीश यांनी  मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे अनुपालन करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकिया यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

  मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ प्रारूप मतदार यादीत आजच आपले नाव तपासा मतदार मदत क्रमांक १८०० २२ १९५० वर संपर्क करा #मतदारय...