Wednesday, November 30, 2016

शेतकऱ्यांसह सर्वच घटकांना कॅशलेस
व्यवहाराबाबत प्रशिक्षण द्या - जिल्हाधिकारी काकाणी
बँकांना निर्देश, नागरिकांनाही डिजिटल पेमेंट मार्ग अवलंबण्याचे आवाहन

नांदेड, दि. 30 :- जिल्ह्यातील शेतकऱ्यांपासून, नागरिकांपर्यंत दैनंदिन व्यवहारात डिजिटल पद्धतीने आर्थिक देवाण-घेवाणी घेण्यासाठीच्या मार्गांबाबत लोकशिक्षण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे दिले. शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याचे विविध मार्ग, बाजार समिती, आठवडी बाजार त्याही पुढे जाऊन घराघरांत रोखविरहीत (कॅशलेस) व्यवहार करण्याची माहिती पोहचावी यासाठी शाळा, महाविद्यालय यांच्याद्वारेही प्रयत्न करण्यात यावेत असेही श्री. काकाणी यांनी आज येथे बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितले.  जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकाचे प्रमुख अधिकारी तसेच अन्य बँक अधिकाऱ्यांच्या समवेत जिल्हाधिकारी काकाणी यांनी विशेष बैठक घेतली. त्याबैठकीत ते बोलत होते.
जिल्ह्यातील रोखविरहीत (कॅशलेस) व्यवहारांच्या लोकशिक्षणाकरिता कार्यक्रमही आखण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा सहकार उपनिबंधक विनायक कहाळेकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॅा. तुकाराम मोटे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक बी. यु. वाघमारे, नाबार्डचे व्यवस्थापक श्री. धुर्वे आदींची उपस्थिती होती.
बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी काकाणी म्हणाले की,  निश्चलनीकरणानंतर रोखविरहीत (कॅशलेस) व्यवहारांबाबत सामान्य नागरिकांपर्यंत पोहचून माहिती देण्यात यावी. शेतकऱ्यांसाठी बाजार समिती, मोंढे, विविध सहकारी संस्था यांच्या मदतीने प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावेत. याशिवाय बँक व्यवयाय मित्र (बीसीए) यांची संख्या वाढविण्यात यावी. दोन ते तीन गावांमागे एक बँक व्यवसाय मित्र नियुक्त करण्यात यावेत. त्यांच्याद्वारे आधारशी संलग्न तसेच बायोमेट्रीक पद्धतीने रोखविरहीत (कॅशलेस) व्यवहार करता येतात. याची माहितीही पोहचविण्यात यावी. याशिवाय प्वाईंट ॲाफ सेल (पीओएस) यंत्रांची सख्या पुरेशी उपलब्ध होईल. याचाही दक्षता घेण्यात यावी. या यंत्राद्वारे व्यवहार व्हावेत यासाठी बँकांनी विशेषत्वाने प्रयत्न करावेत.  जनधन योजनेशी निगडीत खात्यांवरील व्यवहार रुपे कार्ड, किसान कार्ड यांच्या माध्यमातून व्हावेत यासाठी बँकांनी लोकांमध्ये पोहचून माहिती द्यावी.
यावेळी बैठकीत रोखविरहीत (कॅशलेस) व्यवहार व्हावेत, डिजीटल व्यवहार व्हावे यासाठी शाळा, महाविद्यालये, आठवडी बाजार तसेच दुकान निरीक्षक यांच्यासह विविध घटकांच्या माध्यमातून जनजागृतीसाठी प्रयत्न करावेत असे निर्देशही श्री. काकाणी यांनी दिले. या प्रशिक्षणासाठीचे साहित्य, विविध प्रकारचे माहितीपत्रके, दृक-श्राव्य (व्हिडीओज्) आदींचाही वापर करण्यावर भर द्यावा, अशीही सुचना करण्यात आली.
डिजिटल व्यवहाराची व्याप्ती वाढविताना रोखीने आर्थिक व्यवहारांचे प्रमाण कमी करण्याचे उद्दीष्ट असून त्याद्वारे व्यवहारात पारदर्शकता आणणे हे ध्येय आहे. नागरिकांनी या पद्धतीचा अवलंब करुन अधिकाधिक डिजिटल व्यवहार करावेत, असे आवाहन जिल्हाधिकरी काकाणी यांनी केले आहे.


– डिजिटल बँकिंगचे विविध मार्ग –
1) यूपीआय : या पद्धतीत आपला मोबाईल क्रमांक बँक अथवा एटीएम मध्ये नोंदवा. संबंधित बँकेचे ॲप डाऊनलोड करा. आपला आयडी तयार करा. आपला पिन नंबर सेट करा. यानंतर आपण कोठूनही आपली आर्थिक देवाण-घेवाण करु शकतात.
2) यूएसएसडी : आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक करा. आपल्या फोन वरुन * 99 # डायल करा. आपल्या बँकेचे नाव भरा (फक्त पहिली तीन आद्याक्षरे) किंवा आयएफएससी कोडची पहिली चार अक्षरे, फंड ट्रान्स्फर- MMID हा ऑप्शन निवडा. ज्यांच्याशी व्यवहार करावयाचा आहे त्यांचा मोबाईल नंबर आणि MMID टाका, द्यावयाची रक्कम आणि MPIN स्पेस आणि खाते नंबरचे शेवटचे चार अंक भरा. यानंतर आपण आर्थिक देवाण-घेवाण करु शकतात.
 3) ई वॅलेट : एसबीआय बडी प्रमाणे वॅलेट डाऊन लोड करा, आपला मोबाईल नंबर रजिस्टर करा, त्याला आपल्या डेबिट, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगशी लिंक करा, आता तुमचा फोन हेच तुमचे वॅलेट अर्थात पैशाचे पाकीट झाले आहे.
4) कार्डस्‍ : आपली आर्थिक देयके आपल्या प्रिपेड, क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे करा. आपले कार्ड स्वाईप करा, आपला पिन नंबर टाका, पावती घ्या.
5) आधार संलग्न पेमेंट पद्धती : आपले आधार कार्ड हे आपल्या बँक खात्याशी संलग्न करा. आपण आपली देवाण-घेवाण, खात्यावरील शिलकेची चौकशी, पैसे जमा करणे, काढणे, एका खात्यातून दुसऱ्या खात्यावर पाठविणे हे सर्व व्यवहार करु शकता.

0000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...