Monday, August 2, 2021

 

विषबाधेच्या संकटातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी 

शास्त्रोक्त पद्धतीने किटक नाशकाची फवारणी करावी

- जिल्हा परिषद अध्यक्षा मंगारणी अंबुलगेकर 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- शेतकऱ्यांना विवध नैसर्गिक आव्हानांचा सामना करावा लागतो. या आव्हानात किटक नाशकाची फवारणी करताना होणारी विषबाधा व अपाय दुर्लक्षून चालणार नाहीत. हे संकट शेतकऱ्यांनी काळजी घेतली तर पूर्णतः टळण्यासारखे आहे. आरोग्याचा विचार करून शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक कीटक नाशकांची फवारणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगारानी अंबुलगेकर यांनी केले. राज्य शासनाचा कृषि विभाग व जिल्हा परिषद कृषि विभागाच्यावतीने हाती घेतलेल्या प्रात्यक्षिक मोहिमेच्या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाद्वारे त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. नांदेड तालुक्यातील सायाळ गावातील मुंजाजी धुमाळ यांच्या शेतात कापसाच्या पिकावरील फवारणीचे प्रात्यक्षिक आज शास्त्रज्ञानी शेतकऱ्यांना करुन दाखविले. यावेळी त्या बोलत होत्या.   

या कार्यक्रमास आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा ठाकूर-घुगे, कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. अरविंद पांडागळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, जिल्हा परिषद कृषि विकास अधिकारी संतोष नादरे हे उपस्थित होते. 

कृषि विभागाचा हा अभिनव उपक्रम असून शेतकऱ्यांनी कृषि तज्ज्ञाच्या सल्याला प्राधान्य देऊन अधिकाधिक सुरक्षित शेती करण्याकडे प्राधान्य दिले पाहिजे, असे स्पष्ट करुन आमदार बालाजी कल्याणकर यांनी शेतकऱ्यांच्या पिक व्यवस्थापनाला सदिच्छा दिल्या. 

शेतातील पिकांवर किटकनाशकाची फवारणी करतांना कराव्याच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनातर्फे शेतकऱ्यांना वेळोवेळी आवाहन केले जाते. यासाठी कार्यशाळाही घेतल्या जातात. शेताच्या बांधावरुन थेट प्रात्यक्षिक विविध शेतकऱ्यांपर्यंत पोहाचावे व तज्ज्ञांचे मार्गदर्शनही त्यांना सहज उपलब्ध व्हावे, यादृष्टिने हे प्रात्यक्षिक फेसबुक लाईव्हद्वारे आम्ही करीत आहोत. जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना याचा लाभ होईल, अशा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला. 

शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तो अन्नदाता आहे. हा अन्नदात आरोग्याच्यादृष्टिनेही अधिक सुरक्षित राहिला तर देश सुरक्षित राहिल. शेतातल्या विविध प्रयोगासह शेतकऱ्यांना किटनाशकांची फवारणी करतांना अधिक काळजी घेणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. 

कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. अरविंद पांडागळे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. त्यांनी यावेळी पिकाला पोषक असणारी मित्रकिटकही असतात असे सांगून शेतकऱ्यांना अधिक सावध होऊन फवारणी करण्याचे आवाहन केले. 

यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, जिल्हा परिषद कृषि विकास अधिकारी संतोष नादरे, पोखर्णी येथील शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास गटातील जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकरी, शेतकरी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

000000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...