Friday, August 12, 2022

 भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्याच्या सूचना 

नांदेड (जिमाका) 12 :- भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 75 वा वर्धापन दिन सोमवार दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी साजरा करण्यात येणार आहे. सन 2019 प्रमाणे यावर्षी राज्यात स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी निर्देश राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत देण्यात आले आहेत.

 

राज्यात सर्व विभागीय, जिल्हा, उपविभागीय, तालुका मुख्यालयात तसेच ग्रामपंचायत मुख्यालय येथे ध्वजारोहण करुन स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात यावा. पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती व कोकण विभागीय आयुक्त यांनी आपापल्या विभागातील तसेच जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्याची योग्य ती व्यवस्था करावी. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते मुंबईत मंत्रालय येथे सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहण करून साजरा करण्यात येईल. पुणे येथे राज्यपाल महोदयांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.

 

ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी 9.05 वाजता आयोजित करण्यात यावा. या दिवशी सकाळी 8.35 ते 9.35 या वेळेत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी 8.35 वाजेपूर्वी किंवा 9.35 वाजेनंतर आयोजित करावा.

 

राष्ट्रध्वजाला वंदन करताना राष्ट्रगीत वाजविण्यात यावे. सलामीच्या वेळी सज्ज असलेला बॅण्ड सलामीपूर्वी व सलामीनंतर वाजवावा. यावेळी करण्यात येणाऱ्या भाषणांचा विषय हा स्वातंत्र्यदिनाचे महत्व विशद करणारा तसेच उपस्थितांना देशाची एकता व अखंडता अबाधित ठेवण्यासाठी कार्य करण्यासाठी प्रेरित करणारे असावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

 

संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसिलदार हे अनुक्रमे उपविभागीय मुख्यालय व तालुका मुख्यालय आणि सरपंच किंवा गाव प्रमुख हे ग्रामपंचायत मुख्यालय येथे ध्वजारोहण करतील. समारंभास उपस्थित राहणाऱ्या सर्व व्यक्तींनी राष्ट्रीय पोषाख परिधान करावा. दिवसभरातून विविध कार्यक्रम जसे वृक्षारोपण, आंतर शालेय, आंतर महाविद्यालय स्तरावर ऑनलाईन पध्दतीद्वारे वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजूषा, देशभक्तीपर निबंध व कविता स्पर्धांचे आयोजन करावे. सोशल मिडीयाद्वारे निवडक विद्यार्थी, विद्यार्थीनींचे देशभक्तीपर गाणे, भाषणे आयोजित करावीत. शासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई करावी, एखाद्या विषयाचा वेबिनार आयोजित करावा, एनएसएस व एनवायकेएसद्वारे देशभक्तीपर ऑनलाईन मोहिम राबविण्यात यावी, तसेच सोशल मिडीया व डिजीटल माध्यमाद्वारे देशभक्तीपर किंवा राष्ट्रीय एकात्मतेसंबंधातील गाण्यांचा प्रचार करावा, संदेश द्यावा.

 

राज्यातील सर्व सार्वजनिक व शासकीय इमारतीवर (ग्रामीण भागात सुद्धा) तसेच ऐतिहासिक महत्वाच्या किल्ल्यांवर (उदा. रायगड, सिंहगड, शिवनेरी, पुरंदर, वसई, प्रतापगड, दौलताबाद, सिताबर्डी) राष्ट्रध्वज उभारण्यात यावा.  राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक दिनांक 20 मार्च 1991, 5 डिसेंबर 1991 आणि 11 मार्च 1998 अन्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. ध्वजारोहणाची रंगीत तालीम घेतली जाईल याचीही दक्षता घ्यावी. राष्ट्रध्वज चांगल्या स्थितीत असल्याची व सुर्यास्तास उतरवला जाईल याचीही दक्षता घेण्यात यावी.

खासदार, आमदार, जिल्हा परिषद / पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नींना व आई-वडीलांना, स्थानिक राजकीय पक्षांचे प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती, स्थानिक शासकीय अधिकारी आणि प्रमुख नागरिक यांना मुख्य शासकीय कार्यक्रमास निमंत्रित करावे.

 

पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती विभागीय आयुक्त हे त्यांच्या विभागीय मुख्यालयात ध्वजारोहण समारंभाची व्यवस्था करणार असल्यामुळे तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी वेगळे कार्यक्रम करण्याची आवश्यकता नाही. कोकण विभागीय आयुक्त हे कोकण भवन येथील समारंभाची व्यवस्था करतील. मुंबई शहर जिल्हाधिकारी यांनी ध्वजारोहणाची कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही.

 

संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी आपआपल्या अधिकार क्षेत्रात स्वातंत्र्य दिन समारंभ साजरा करण्यासंबंधी आवश्यक ती कार्यवाही करावी. विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी या परिपत्रकात दिलेले निर्देश योग्य प्रकारे पाळण्यात येतील याची व्यक्तीश: दक्षता घ्यावी.

 

आचारसंहिता अंमलात असल्यास पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत असून सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी. ध्वजारोहणाच्या नेहमीच्या स्थळामध्ये बदल करण्यात येऊ नये. कार्यक्रमाचा राजकीय व्यासपीठावर वापर करू नये.

 

विभागीय मुख्यालयी / जिल्हा मुख्यालयी ध्वजारोहण करण्यासाठी उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांबाबत सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येत आहेत. हा कार्यक्रम साजरा करतांना कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या गृह मंत्रालय व तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी. यासंदर्भातील शासन परिपत्रक आज सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेमार्फत दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजी निर्गमित करण्यात आले असून ते राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

00000

No comments:

Post a Comment

  ​ वृत्त क्रमांक 38   ​ उमरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा दिनाचे रविवारी आयोजन   नांदेड दि.   10   जानेवारी :- उमर...