Friday, August 12, 2022

 14 ऑगस्ट हा दिवस फाळणी अत्याचार स्मृती दिन म्हणून पाळावा 

नांदेड (जिमाका) दि. 12 :-  देशाला सन 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले. याच्या अगोदर फाळणीमुळे अनेक नागरिकांना विस्थापित व्हावे लागले, अनेकांना प्राण गमवावे लागले, अनेकांवर अत्याचार झाले. फाळणीतील लाखो भारतीय विस्थापितांनी दिलेल्या बलिदानाचे, सहन केलेल्या अत्याचार,  दु:ख, वेदना, संवेदना लोकांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने 14 ऑगस्ट हा दिवस फाळणी अत्याचार स्मृती दिन म्हणून पाळण्यात येत आहे. याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली.

 

या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फाळणी अत्याचार स्मृती दिनानिमित्त प्रत्येक कार्यालयात यादृष्टीने योग्य ते उपक्रम करण्याबाबत कार्यालय प्रमुखांना सूचना दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी दिपाली मोतीयाळे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर व विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

 

फाळणी अत्याचार स्मृती दिवस या दिनी देशाच्या फाळणीत बळी पडलेल्या लाखो लोकांवर झालेले अत्याचार, त्यांच्या वेदना तसेच विस्थापित झालेल्या लोकांचे दु:ख लोकांसमोर मांडले जावे ही या मागची संकल्पना आहे. फाळणीग्रस्त जनतेच्या वेदनेचे प्रदर्शन करण्यासाठी इंडियन कॉन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च, इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्टस यांनी संयुक्तपणे प्रदर्शन भरविलेले आहे. हे प्रदर्शन इंग्रजी व हिंदी मध्ये डिजीटल स्वरूपात https://amritmahotsav.nicin/partition-horror-remembrance-day.htm संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सर्व कार्यालय, शाळा यांनी समाजातील कोणत्याही घटकाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेवून याविषयीचे प्रदर्शन आयोजित करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या.

00000





No comments:

Post a Comment

  ​ वृत्त क्रमांक 38   ​ उमरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा दिनाचे रविवारी आयोजन   नांदेड दि.   10   जानेवारी :- उमर...