जि.प.,
पं.स. निवडणुकीसाठी जिल्ह्यात
उत्साहात
मतदान, महिलांचा उत्स्फुर्त सहभाग
मतदान शांततेत
व सुव्यवस्थेत संपन्न
नांदेड दि. 16
:- जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज जिल्ह्यात मोठ्या
उत्साहात मतदान झाले. यात महिला मतदारांनी उत्स्फुर्तपणे मतदानाचा हक्क बजाविला.
जिल्ह्यात सरासरी 68 टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचा प्राथमिक
अंदाज वर्तविण्यात आला आहे. मतदान प्रक्रिया कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत
व सुव्यवस्थेत पार पडली. यासाठी जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला
होता.
मतदानाला आज सकाळी जिल्ह्यात सुनियोजिरित्या
प्रारंभ झाला. जिल्हा परिषदेचे 63 गट आणि पंचायत समितीच्या 126 गणांसाठी
जिल्ह्यातील 2 हजार 93 मतदान केंद्र स्थापन करण्यात आली. या मतदान
केंद्रावर मतदान करण्यासाठी सकाळपासूनच मतदारांचा चांगला उत्साह राहीला.
जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी वाडी बु., नवीवाडी, विष्णुपूरी येथील मतदान
केंद्रांना भेट देऊन, तेथील व्यवस्थेची पाहणी केली.
सायंकाळी उशीरा पर्यंत
मतदान केंद्रांवर मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या. यामुळे मतदान संपताना
हाती आलेल्या आकडेवारी नुसार जिल्ह्यात सरासरी 68 टक्क्यांपर्यंत मतदान
झाल्याचा अंदाज निवडणूक यंत्रणेने वर्तविला. जिल्हा परिषदेच्या 63 गटांसाठी 374 तर
पंचायत समितीच्या 126 गणांसाठी 603 उमेदवार रिंगणात आहेत. मतदानासाठी पात्र
मतदारांची संख्या 16 लाख 94 हजार 705 इतकी आहे. त्यामध्ये 8 लाख 90 हजार 332 मतदार
पुरूष आणि 8 लाख 4 हजार 363 मतदार स्त्रिया आहेत, तर दहा मतदार इतर म्हणून नोंदणी
केलेले आहेत.
मतदानासाठी सकाळच्या
पहिल्या प्रहरापासूनच मतदानासाठी मतदारांत उत्साह दिसून आला. त्यामुळे अनेक ठिकाणी
मतदान केंद्रावर रांगा लागल्याचे चित्र होते. यात नवमतदार तसेच ज्येष्ठ
मतदारांचीही संख्याही लक्षवेधी होती. महिला मतदारांनी मतदानाचा हक्क उत्स्फुर्तपणे
बजाविला.
मतमोजणी गुरुवार 23
फेब्रुवारी 2017 रोजी संबंधीत तालुक्यांच्या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून सुरु
होणार आहे.
जिल्ह्यात शांततेत व
सुव्यवस्थेत मतदान पार पाडल्याबद्दल जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी जिल्ह्यातील
मतदारांसह निवडणूक यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी तसेच प्रसार माध्यमांचे, आणि
मतदार जागृतीसाठी सहकार्य करणाऱ्या विविध संस्था संघटनांचे आभार मानले आहेत.
000000
No comments:
Post a Comment