Tuesday, June 15, 2021

 

डॉ. शंकरराव चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या हितरक्षणाचे ठरेल प्रतिक - पालकमंत्री अशोक चव्हाण

भोकरच्या डॉ. शंकरराव चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- मोठ्या कष्टातून आणि विविध नैसर्गिक आव्हानावर मात करून पिकवलेल्या आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, आपली लुबाडणूक होऊ नये एवढी माफक अपेक्षा शेतकऱ्यांची असते. या अपेक्षा  डॉ. शंकरराव चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समिती पूर्ण करून शेतकऱ्यांच्या हिताचे नवे मापदंड निर्माण करेल, असा विश्वास नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. 

भोकर येथील डॉ. शंकरराव चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे व व्यापारी गाळ्याचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगराणी अंबुलगेकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती बाळासाहेब रावणगावकर, भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील, उपसभापती पांडुरंग राठोड, गोविंदराव नागेलीकर व विविध पदाधिकारी उपस्थित होते. 

स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांचे भोकर मतदारसंघाचे वेगळे ऋणानूबंध आहेत. या भागाच्या विकासासाठी त्यांनी एक कटिबद्धता जपली होती. इथल्या शेतकऱ्यांना विकासाच्या प्रवाहात कसे आणता येईल. याचा ध्यास त्यांनी शेवटपर्यंत जपला. तीच कर्तव्यभावना व ध्यास घेईन भोकरच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. 

भोकरच्या ग्रामीण भागात चांगल्या रस्त्याचे जाळे निर्माण झाले तर अप्रत्यक्ष येथील शेतमालाची वाहतूक सुरळीत होईल. ग्रामीण भाग बाजारपेठेशी जोडला जाईल, हे लक्षात घेऊन भोकर ते रहाटी रावणगाव मार्गे रस्ते विकासाचे सुमारे 100 कोटी रुपयाचे काम आपण पूर्ण करीत आहोत. भोकर येथून मुदखेडला जाता यावे यासाठी रस्ते विकासाचे काम आपण हाती घेतले आहे. एकट्या भोकर मतदारसंघात सुमारे 200 कोटी रुपयाचे काम हे रस्ते विकासासाठी आपण उपलब्ध केले आहे. याचबरोबर भोकर शहरातील अंतर्गत वार्ड निहाय विकासाचे काम पूर्ण व्हावे, यासाठी सुमारे 17 कोटी 89 लाख रुपयांचा निधी आपण उपलब्ध करून दिला. ही विकासाची कामे नागरिक अनुभवत असुन शेतकऱ्यांच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. 

सद्यस्थितीत उपलब्ध असलेली कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा ही आता कमी पडत असून मागील अनेक वर्षांपासून एमआयडीसीची जी 19 हेक्टर जागा तशीच आहे. त्या जागेवर आणखी एक अतिरिक्त बाजारपेठ साकारून इथल्या कृषी व्यापारासह इतर व्यवसायाला चालना देण्याचे नियोजन आपण करीत असल्याचे त्यांनी सांगितले. भोकरच्या नियोजनात कोणतीही कमतरता पडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून आता नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज शुन्य टक्के दराने देण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य शासनाने घेतल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या दृष्टीने कृषी उत्पन्न बाजार समिती ही आईच्या स्थानी असते. कोणत्याही परस्थितीत शेतकऱ्यांच्या हितरक्षणासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीची भूमिका महत्वाची असते. ही भूमिका यापुढे भोकर येथील डॉ. शकरराव चव्हाण कृषी उत्पन्न समिती पार पाडेल, असा विश्वास पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. 

कार्यक्रमाचे प्रस्ताविक सभापती जगदीश भोसीकर यांनी केले. डॉ. शंकरराव चव्हाण यांची या भागातील शेतकऱ्यांच्या प्रती असलेली तळमळ, सिंचनाच्या माध्यमातून या राज्याला त्यांनी दिलेली विकासाची दृष्टी आणि त्यांची कर्मभूमी लक्षात घेऊन आम्ही कृतज्ञतेच्या माध्यमातून भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीला डॉ. शंकरराव चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समिती भोकर असे नामकरण करण्याचा ठराव घेऊन तो सर्वानूमते पारित केल्याचे जाहीर केले. यावेळी जिल्हा परिषद कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर यांचे समयोचित भाषण झाले.




00000

No comments:

Post a Comment

निवडणुकीच्या लगबगीत माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला.जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे नांदेड लोकसभापोटनिवडणुकीत निवडणूक ...