वृत्त क्र. 375
26 एप्रिलच्या मतदानाची प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात
नागरिकांनी यावेळी 'रेकॉर्ड ब्रेक ' मतदान करण्याचे प्रशासनाचे आवाहन
शुक्रवारला सुटी, निवारा, प्रथमोपचार, प्राथमिक सुविधा पूर्ण
नांदेड दि.२२ : लोकशाहीच्या पर्वातील सर्वात मोठी लोकसभा निवडणूक 26 एप्रिल रोजी होत आहे.सकाळी सात वाजता पासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत 26 एप्रिल रोजी मतदान करता येणार आहे. शासनाने 26 एप्रिलला सुटी घोषित केली असून मतदानाची सर्व तांत्रिक प्रक्रिया तसेच सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत. आज या संदर्भात सर्व विभाग प्रमुखांचा आढावा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी घेतला.
मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर येऊन मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. आपला मताधिकार बजावणे लोकशाहीमध्ये महत्त्वपूर्ण असून यावर्षी जिल्हावाशीयांनी मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने, मुख्य लेखा अधिकारी जनार्दन पक्वाने यांच्यासह अन्य सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
आजच्या बैठकीत प्रामुख्याने मतदान दिवसाच्या शेवटचे 72 तास, 48 तास व 24 तासापूर्वी आणि मतदानाच्या दिवशी करावयाच्या कारवाईबाबत आढावा घेण्यात आला. यामध्ये मतदान घडवून आणणाऱ्या मनुष्यबळाची उपलब्धता व प्रशिक्षण, मतदान केंद्रावरील पायाभूत सुविधा, कायदा आणि सुव्यवस्था, निवडणूक काळातील पैशांचा गैरवापर, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची मुबलक प्रमाणातील उपलब्धता, निवडणूक खर्चावरील सनियंत्रण, मतदारांची जनजागृती, पोलिंग एजंटच्या येणाऱ्या तक्रारी, माध्यमांसाठी निवडणूक आयोगाकडून येणाऱ्या प्राधिकार पत्रांचे वाटप, मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाला नियमित द्यावयाची माहिती, मतदानाच्या वेळी नियमानुसार होणारे मतदान शंभर मीटरच्या आत मधील प्रचार बंदी, मोबाईल वापरावरील बंदी, याबाबतचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
प्रामुख्याने पुढील काही दिवसात कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भातही आढावा यावेळी घेण्यात आला. रात्रीच्या तपासणी वाढवण्यात याव्यात, फिरत्या पथकांकडून तपासणी कसून करण्यात यावी, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.
00000
No comments:
Post a Comment