Friday, September 16, 2022

 पशुधनातील लम्पी आजाराबाबत पशुपालकांनी गोठ्याची स्वच्छता व

दक्षता घेणे आवश्यक
- खासदार प्रताप पाटील चिखलीकर
▪️जिल्ह्यातील पशुसंवर्धन व प्रशासकीय या यंत्रणांना दक्षतेचे आदेश

नांदेड, (जिमाका)दि. 16 :- पशुधनामध्ये विशेषत: गोवंशीय प्राण्यामध्ये लम्पी साथरोगाचा प्रादुर्भाव जिल्ह्यातील काही गावांमध्ये आढळून आला आहे. जिल्हा प्रशासन व पशुवैद्यकीय विभागामार्फत मोठया प्रमाणात लम्पी आजारावर नियत्रंण मिळविण्यासाठी उपाययोजना व दक्षता घेतली जात आहे. पशुपालक व शेतकऱ्यांनी याबाबत शासनाने आवाहन केल्याप्रमाणे गोठयातील स्वच्छता व बाधित असलेल्या जनावरांना गोठयापासून वेगळे करुन त्यांच्यावर तात्काळ औषधोपचार सुरु करावेत, असे आवाहन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे आयोजित केलेल्या लम्पी आजाराच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मधुसुदन रत्नपारखी, महा वितरण नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर, अधिक्षक अभियंता सुधाकर जाधव, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भुपेंद्र बोधनकर, सहाय्यक आयुक्त प्रविण कुमार घुले, डॉ. अरविंद गायकवाड आदीची उपस्थिती होती.

जनावरातील साथीच्या आजाराबाबत रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. विशेषत: नांदेड शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न अधिक गंभीर आहे. मनपाने यात तातडीने लक्ष घालून उपाययोजना कराव्यात असे निर्देश खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिले. याचबरोबर गावपातळीवर दंवडी व इतर संपर्काची माध्यमे प्रभावीपणे उपयोगात घ्यावीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

साथरोगावर नियंत्रणासाठी सर्व ग्रामपंचायत पातळीवर स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषद पशुवैद्यकीय विभाग संबंधित यंत्रणाशी समन्वय साधून आहे. यासाठी औषधोपचाराची कुठलीही कमतरता नसून राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे योग्य ती खबरदारी घेतल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी दिली. पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रविण कुमार घुले यांनी लम्पी आजाराबाबत जिल्ह्यातील आढावा सादर केला आहे.
0000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...