Friday, November 6, 2026

 वृत्त क्रमांक

दुष्काळी परिस्थितीत शेतकरी-पशुपालकांच्या पाठीशी प्रशासन खंबीरपणे उभे-जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

• पाथरड येथे दूध उत्पादक भावफरक वितरण व दुष्काळ निवारण मार्गदर्शन मेळावा

नांदेड, दि. 6 : दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आणि पशुपालकांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, पशुधनासाठी चारा व पाण्याचे योग्य नियोजन करण्यावर भर देण्यात येत आहे. शेतकरी व पशुपालकांनी उपलब्ध साधनसंपत्तीचा काटकसरीने वापर करून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. जिल्हा प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली. 

हदगाव तालुक्यातील पाथरड येथे पाथरड दूध उत्पादक असोसिएशनच्या वतीने आयोजित दूध उत्पादक भावफरक वितरण व दुष्काळ निवारण मार्गदर्शन मेळाव्यात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबुराव पाटील पाथरडकर होते. यावेळी उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन डॉ. सखाराम खुणे, सहाय्यक आयुक्त डॉ. प्रवीणकुमार घुले आदी उपस्थित होते.

डॉ. खुणे यांनी पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना व विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पांतर्गत उपलब्ध सुविधांची माहिती दिली. सोयाबीन कुटाराचे पोषणमूल्य वाढविणे, कडबाकुट्टी, मुरघास निर्मिती, हिरव्या चाऱ्याचे उत्पादन आणि संतुलित पशुआहार याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. घुले यांनी चारा साक्षरता अभियान व दुष्काळ निवारणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी जिल्हा वार्षिक योजना 2026-27 अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पशुपालकांना संकरित ज्वारीच्या ‘शुगरग्रेज’ चारा बियाण्याचे प्रातिनिधिक वाटप करण्यात आले. तसेच उच्च उत्पादनक्षम पशुधन निर्मितीसाठी लिंगवर्गीकृत रेतमात्रा सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

पाथरड दूध उत्पादक असोसिएशनच्या कार्याचे कौतुक करत जिल्हाधिकाऱ्यांनी दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून गावातील शेतकऱ्यांनी उभारलेल्या आर्थिक प्रगतीच्या आदर्शाचे विशेष उल्लेख केला. कार्यक्रमानंतर त्यांनी प्रगतिशील पशुपालक गोविंद पवार यांच्या मुक्त संचार गोठ्याला भेट देऊन संकरित गाईंचे संगोपन, हिरवा व वाळलेला चारा, सोयाबीन कुटार आणि मुरघास साठवणुकीची पाहणी केली. 

यावेळी तहसीलदार, गटविकास अधिकारी, अमूल डेअरीचे अधिकारी, पशुसंवर्धन, महसूल, पंचायत समिती, रोजगार हमी व सहकार विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच परिसरातील दूध उत्पादक व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

***






No comments:

Post a Comment

महात्मा जोतीराव फुले यांच्या परिवर्तनवादी विचारांचा जागर घडविणारी मंत्री छगन भुजबळ यांची विशेष मुलाखत ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्...