वृत्त क्रमांक
जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 6 : दिवाळी, गुरुतागद्दी सोहळा तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नांदेड जिल्ह्यात 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 22 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी किरण आंबेकर यांनी हे आदेश जारी केले आहेत.
दि. 8 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन, त्यानंतर दिवाळी पाडवा व भाऊबीज हे सण साजरे होणार आहेत. तसेच गुरुद्वारा सचखंड येथे बंदीछोड दिवसानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. 9 नोव्हेंबर रोजी दिवाळीनिमित्त शीख समाजाच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून, त्यात पंजाब, हरियाणा, दिल्ली व इतर राज्यांतील भाविकांसह सुमारे 8 ते 9 हजार नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे. 11 ते 15 नोव्हेंबरदरम्यान गुरुतागद्दी कार्यक्रम, नगरकीर्तन, धार्मिक सोहळे तसेच 15 नोव्हेंबर रोजी समारोप मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
याशिवाय राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची आंदोलने, मोर्चे तसेच विविध समाजांच्या आरक्षणविषयक मागण्या आणि इतर संघटनांच्या वतीने आंदोलने, रॅली व मोर्चे निघण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींचा विचार करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी किंवा त्याच्या आसपास शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येणाऱ्या वस्तू बाळगण्यास मनाई आहे. तसेच दाहक व स्फोटक पदार्थ, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे जवळ बाळगणे, जमा करणे अथवा तयार करणे, व्यक्तींच्या किंवा प्रतिमांच्या प्रदर्शनासह प्रक्षोभक घोषणा, गाणी, भाषणे, हावभाव तसेच शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविणाऱ्या कृती करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. जिल्ह्यात पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमण्यासही मनाई करण्यात आली आहे.
कर्तव्यावरील पोलीस अधिकारी व शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा तसेच सक्षम प्राधिकाऱ्यांची विशेष परवानगी असलेल्या मिरवणुकांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. सभा, मिरवणुका, मोर्चे काढणे, पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमणे आणि ध्वनिक्षेपक वापरण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किंवा पोलीस अधीक्षकांनी प्राधिकृत केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक राहणार आहे.
या आदेशाची जिल्ह्यात व्यापक प्रसिद्धी करण्याचे निर्देशही पोलीस अधीक्षक नांदेड यांना देण्यात आले आहेत. नागरिकांनी आदेशाचे पालन करून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
**
No comments:
Post a Comment