वृत्त क्रमांक
केदारगुडा येथील गोशाळेची पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी
• दुष्काळी स्थितीत पशुधनाच्या चारा व्यवस्थापनावर भर
नांदेड, दि. 6: जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता, साठवणूक व व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हदगाव तालुक्यातील केदारगुडा येथील नामदेव महाराज गोपालन व ग्रामविकास प्रतिष्ठान, कोंडुर संचालित गोशाळेची आज पाहणी केली. यावेळी जिल्हा उपआयुक्त डॉ. सखाराम खुणे, सहाय्यक आयुक्त डॉ. प्रवीणकुमार घुले, जिल्हा प्रकल्प अधिकारी डॉ. सतीश खिल्लारे व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. साईनाथ पवार उपस्थित होते.
पाहणीदरम्यान गोशाळेतील वाळलेल्या चाऱ्याचा साठा व साठवणूक व्यवस्थेची तपासणी करण्यात आली. संभाव्य चाराटंचाई लक्षात घेऊन चाऱ्याचा काटकसरीने वापर, आगाऊ साठवणूक, स्थानिक चारा संसाधनांचा प्रभावी वापर, निकृष्ट चाऱ्याचे पोषणमूल्य वाढविणे आणि चाऱ्याची नासाडी टाळण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पशुधनाला संतुलित आहार व पुरेसे स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
सदर गोशाळेचा महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या परिपोषण योजनेंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. दुष्काळी परिस्थितीत गोशाळांमधील पशुधनाचे संरक्षण, योग्य पोषण आणि चाऱ्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्याला प्राधान्य देण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले.
**
.jpeg)


No comments:
Post a Comment