वृत्त क्रमांक
लोकशाही बळकटीकरणासाठी युवकांचा सक्रिय सहभाग आवश्यक
• ‘विकसित भारत युवा संवाद’ मध्ये खासदार डॉ. अजित गोपछडे यांचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद
नांदेड, दि. 6 : युवकांमध्ये लोकशाही प्रक्रियेविषयी जागरूकता निर्माण करून राष्ट्राच्या विकासाशी संबंधित विषयांवर त्यांचे विचार जाणून घेण्याच्या उद्देशाने माय भारत (MY Bharat) यांच्या वतीने ‘विकसित भारत युवा संवाद – Know Your Vote’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. युवकांनी सामाजिक जबाबदारी स्वीकारून लोकशाही प्रक्रिया आणि देशाच्या विकासात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक डॉ. महेश कोकरे, नगरसेवक शांभवी साले, माय भारतच्या जिल्हा युवा अधिकारी अशनी कानकटे, प्रा. माधव वैद्य, प्रा. देवयानी देशमुख आणि प्रा. रेखा भालेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा युवा अधिकारी अशनी कानकटे यांनी प्रास्ताविक केले. प्रा.देवयानी देशमुख यांनी निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचे दृकश्राव्य सादरीकरण करून मतदार नोंदणी व मतदार यादी पडताळणीची माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वच्छता, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील युवकांचा सहभाग, मतदार यादी पुनरीक्षण, वैद्यकीय प्रवेश परीक्षा, ऑनलाइन जुगारविरोधी कायदा, अल्पवयीन मुलांवरील समाजमाध्यमांचा प्रभाव आणि ‘एक देश, एक परीक्षा’ यांसारख्या विषयांवर प्रश्न उपस्थित केले. खासदार डॉ. गोपछडे यांनी या प्रश्नांना उत्तरे देत शासनाच्या विविध योजना, कायदे व विकासात्मक उपक्रमांची माहिती दिली.
कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व विशद करताना त्यांनी कृषी विज्ञान केंद्र, अंबाजोगाई येथे आयोजित ड्रोन कार्यशाळेचे उदाहरण दिले. युवकांनी नव्या तंत्रज्ञानाची माहिती घेऊन सामाजिक व राष्ट्रीय विकासात योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले. या संवादातून विद्यार्थ्यांना लोकप्रतिनिधींशी थेट चर्चा करून विविध राष्ट्रीय व सामाजिक विषयांवरील शंका मांडण्याची संधी मिळाली. लोकशाहीतील युवकांचा सहभाग आणि राष्ट्रनिर्मितीतील त्यांची भूमिका अधोरेखित करणाऱ्या या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
***

No comments:
Post a Comment