वृत्त क्रमांक
रब्बी हंगामात कमी पाणी लागणाऱ्या पिकांना प्राधान्य
द्या
- ऊस, गहू, मका,
चिया पिकांची लागवड टाळण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका), दि. 16 : जिल्ह्यात परतीचा पाऊस झालेला नसल्याने
जमिनीतील ओलावा कमी झाला असून, भूजल पातळीत सरासरी 2.5 मीटरने घट झाली आहे. आगामी रब्बी हंगामातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात
घेता शेतकऱ्यांनी ऊस, गहू, मका,
चिया यांसारख्या अधिक पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड टाळावी.
त्याऐवजी जमिनीचा प्रकार, उपलब्ध ओलावा आणि सिंचनासाठी
उपलब्ध पाणी यांचा विचार करून पिकांची निवड करावी, असे आवाहन
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
संभाव्य एल निनोचा प्रभाव, पावसातील अनिश्चितता आणि पाणी उपलब्धतेचा विचार करता शेतकऱ्यांनी केवळ
अंदाजांवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष पर्जन्यमान व पाण्याची उपलब्धता यांचे
मूल्यमापन करावे. मध्यम काळ्या जमिनीत उपलब्ध ओलावा व मर्यादित पाण्यानुसार करडई,
हरभरा आणि रब्बी ज्वारी या पिकांना प्राधान्य द्यावे. जमिनीत पुरेसा
ओलावा नसल्यास पेरणीची घाई करू नये. तसेच कोरडवाहू शेतीसाठी शिफारस केलेल्या
वाणांचीच लागवड करावी.
कमी पाण्यात घेता येणाऱ्या करडई पिकासाठी
मराठवाड्यात परभणी सुवर्णा (पीबीएनएस-154), परभणी कुसुम (पीबीएनएस-12) आणि विद्यापीठाच्या
अधिकृत शिफारशीनुसार पीबीएनएस-86 (पूर्णा) या वाणांचा विचार
करावा. खोल काळ्या जमिनीत चांगला अवशिष्ट ओलावा उपलब्ध असल्यास रब्बी ज्वारीची
लागवड करावी. यासाठी परभणी सुपर मोती (एसपीव्ही-2407),
परभणी मोती (एसपीव्ही-1411) आणि पीकेव्ही
क्रांती या वाणांची स्थानिक शिफारशीनुसार निवड करावी.
जमिनीत पुरेसा ओलावा असलेल्या क्षेत्रात
हरभरा हे महत्त्वाचे कडधान्य पीक ठरू शकते. विजय, दिग्विजय,
आकाश आणि जाकी-9218 या वाणांपैकी स्थानिक
परिस्थिती, पीक कालावधी, कोरडवाहू
लागवडीची उपयुक्तता आणि विद्यापीठाच्या शिफारशींनुसार योग्य वाण निवडावा. आगामी
रब्बी हंगामातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी उपलब्ध जलसाठ्याचा
काटकसरीने वापर करावा आणि जमिनीचा प्रकार, उपलब्ध ओलावा व
सिंचनाची स्थिती यानुसार पीक नियोजन करावे, असे आवाहन जिल्हा
अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment