Friday, October 16, 2026

 वृत्त क्रमांक

बालमृत्यू रोखण्यासाठी दुर्गम भागातील आरोग्य यंत्रणेने सतर्क राहावे- मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांचे निर्देश

 

  • किनवट, माहूरमधील माता-बाल आरोग्यसेवेचा घेतला आढावा

 

नांदेड(जिमाका), दि. 16  : जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. माता-बालमृत्यू रोखण्यासाठी तसेच बालकांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी आरोग्य यंत्रणेने अधिक सतर्क राहून नियमित क्षेत्रीय निरीक्षण करावे, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली गाभा समितीची आढावा बैठक झाली. या बैठकीत किनवट व माहूर तालुक्यांतील दुर्गम भागातील आरोग्यसेवा, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, माता-बाल आरोग्य, कुपोषण प्रतिबंध आणि विविध आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत किनवट व माहूर तालुक्यांतील प्रत्येक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करावी. आजारी विद्यार्थ्यांना तातडीने उपचार, समुपदेशन आणि आवश्यकतेनुसार पुढील उपचारांसाठी संदर्भसेवा उपलब्ध करून द्यावी. हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असलेल्या गर्भवती व मातांची स्वतंत्र यादी तयार करून त्यांची नियमित तपासणी, औषधोपचार आणि शासकीय योजनांचा लाभ सुनिश्चित करावा, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी दिल्या.

नवसंजीवनी क्षेत्रातील गर्भवती मातांची अद्ययावत यादी प्रत्येक आरोग्य संस्थेत उपलब्ध ठेवून त्यांना ‘माहेरघर’ योजनेचा वेळेत लाभ द्यावा. शंभर टक्के संस्थात्मक प्रसूती आणि आवश्यक संदर्भसेवा सुनिश्चित करावी. तसेच आरोग्य व महिला-बालविकास विभागाने समन्वयाने मोहीम राबवून तीव्र व मध्यम तीव्र कुपोषित बालकांचा शोध घ्यावा. त्यांची तातडीने तपासणी, उपचार आणि आवश्यकतेनुसार पुढील उपचारांसाठी संदर्भसेवा उपलब्ध करून द्यावी. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रीय भेटी देऊन योजनांच्या अंमलबजावणीचे निरीक्षण करावे आणि प्रलंबित बाबींचा तातडीने निपटारा करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नेवले, महिला व बालकल्याण अधिकारी डॉ. प्रशांत थोरात, आरोग्य सेवा उपसंचालक (कुष्ठरोग) डॉ. बालन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रतिनिधी, किनवट व माहूरचे तालुका आरोग्य अधिकारी तसेच आरोग्य विभागाचे विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. माता-बालमृत्यू प्रतिबंध, बालकांचे आरोग्य संवर्धन आणि दुर्गम भागातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत आरोग्य योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

*****

No comments:

Post a Comment

महात्मा जोतीराव फुले यांच्या परिवर्तनवादी विचारांचा जागर घडविणारी मंत्री छगन भुजबळ यांची विशेष मुलाखत ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्...