वृत्त क्रमांक
चारा पिकांच्या अवशेषांच्या विक्री-वितरणाबाबत सुधारित
आदेश
पशुधनासाठी चारा राखून ठेवूनच कुटार विक्रीस परवानगी
नांदेड (जिमाका), दि. 16 : जिल्ह्यातील सर्व 16
तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्याने संभाव्य चाराटंचाईचा धोका निर्माण झाला आहे.
पशुधनासाठी स्थानिक पातळीवर पुरेसा चारा उपलब्ध राहावा आणि चाराटंचाईच्या काळात
पशुपालकांची गैरसोय होऊ नये, यासाठी चारा पिकांच्या अवशेषांच्या
विक्री व वाहतुकीबाबतच्या पूर्वीच्या आदेशात सुधारणा करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी याबाबत सुधारित आदेश निर्गमित केला आहे.
पूर्वीच्या आदेशात चारा पिकांच्या
अवशेषांची विक्री व वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली होती. आता या आदेशात
पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात आली आहे.
पशुधन नसलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या
शेतातील कुटार प्रथम परिसरातील पशुधन असलेल्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याबाबत
विचारणा करावी. त्यानंतर उर्वरित कुटार बायोमास ब्रिकेट, पेलेट निर्मिती किंवा इतर उद्योगांना देता येईल.
पशुधन असलेल्या शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या
पशुधनासाठी आवश्यक कुटाराची व्यवस्था करून ठेवावी. त्यानंतर उर्वरित कुटार
विक्रीसाठी उपलब्ध करून देता येईल. यासाठी विहित नमुन्यातील प्रमाणपत्र
तालुकास्तरीय पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकाऱ्यांकडे सादर करणे आवश्यक आहे.
बायोमास ब्रिकेट व पेलेट निर्मिती
उद्योगांसाठीही सुधारित तरतूद करण्यात आली असून, दररोज
प्राप्त होणाऱ्या कुटारापैकी किमान 50 टक्के साठा शासनाच्या
आवश्यकतेनुसार शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या राखीव
साठ्याची माहिती जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, नांदेड तसेच निवासी उपजिल्हाधिकारी, नांदेड
यांच्याकडे वेळोवेळी सादर करावी.
दि. 7 ऑक्टोबर 2026 रोजी निर्गमित आदेशातील इतर सर्व तरतुदी कायम ठेवून हा सुधारित आदेश
तात्काळ प्रभावाने लागू राहील.
*******
No comments:
Post a Comment