वृत्त क्रमांक
विधान परिषद निवडणुकीत मतदान करताना नियमांचे पालन करा
·
प्रथम पसंतीच्या उमेदवारासमोर
‘1’ हा अंक लिहिणे अनिवार्य
·
मत नोंदविताना जांभळ्या स्केच
पेनचाच वापर करा
नांदेड (जिमाका), दि. 16 : भारत निवडणूक आयोगाने 22 सप्टेंबर 2026 रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम
जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार आहे.
या निवडणुकीत मतपत्रिकेद्वारे
पसंतीक्रमानुसार मतदान केले जाणार आहे. मतदानासाठी आयोगाकडून उपलब्ध करून देण्यात
आलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचाच वापर करणे आवश्यक आहे. मतदारांनी मतदानाची
पद्धत समजून घेऊन पुढील सूचनांचे पालन करावे.
मतदानाची पद्धत व महत्त्वाच्या सूचना
1. मतपत्रिकेसोबत पुरविण्यात आलेल्या
जांभळ्या रंगाच्या स्केच पेननेच मत नोंदवावे. अन्य पेन, पेन्सिल
किंवा बॉलपेन वापरू नये.
2. प्रथम पसंतीच्या उमेदवाराच्या
नावासमोरील ‘पसंतीक्रम’ या स्तंभात ‘1’ हा अंक लिहावा. हा अंक
केवळ एका उमेदवारासमोरच लिहावा.
3. उमेदवारांची संख्या कितीही असली,
तरी केवळ एका उमेदवाराच्या नावासमोरच ‘1’ हा
अंक लिहावा.
4. इतर उमेदवारांना पसंती द्यायची असल्यास
त्यांच्या नावासमोर अनुक्रमे ‘2’, ‘3’,
‘4’ इत्यादी अंक लिहिता येतील. इतर पसंतीक्रम नोंदविणे ऐच्छिक आहे. निवडणूक
लढविणाऱ्या उमेदवारांच्या एकूण संख्येइतके पसंतीक्रम नोंदविता येतात.
5. प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर एकच
पसंतीक्रम लिहावा. एकच पसंतीक्रम एकापेक्षा अधिक उमेदवारांसाठी वापरू नये.
पसंतीक्रम शब्दांत (एक, दोन, तीन
इत्यादी) न लिहिता मान्यताप्राप्त अंकांमध्ये दर्शवावा.
6. पसंतीक्रम दर्शविण्यासाठी
आंतरराष्ट्रीय स्वरूपातील भारतीय अंक, रोमन अंक किंवा भारतीय
संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये मान्यता प्राप्त असलेल्या कोणत्याही भारतीय
भाषेतील अंक वापरता येतात.
7. मतपत्रिकेवर स्वाक्षरी, आद्याक्षरे, स्वतःचे नाव किंवा इतर कोणतेही शब्द
लिहू नयेत. अंगठ्याचा ठसाही उमटवू नये.
8. पसंती दर्शविण्यासाठी ‘टिक’ (√) किंवा ‘क्रॉस’ (X) अशी खूण करू नये. अशी खूण असलेली मतपत्रिका अवैध ठरते.
मतपत्रिका वैध ठरण्यासाठी किमान एका
उमेदवाराच्या नावासमोर ‘1’ हा अंक लिहून प्रथम पसंती नोंदविणे
आवश्यक आहे. त्यामुळे मतदान करण्यापूर्वी मतदारांनी वरील सूचनांची नोंद घ्यावी व
योग्य पद्धतीने मतदान करावे, असे आवाहन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी
राहुल कर्डिले यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment