Thursday, October 22, 2026

 वृत्त क्रमांक                                                                                

औरंगाबाद विभाग पदवीधर निवडणुकीसाठी नांदेड प्रशासन सज्ज

 

  • जिल्ह्यातील 120 मतदान केंद्रांवर 36 हजार 687 मतदार बजावणार मतदानाचा हक्क
  • जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे मतदारांना आवाहन

 

 

नांदेड, दि. 22 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नांदेड जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील 120 मतदान केंद्रांवर उद्या शुक्रवार, दि. 23 ऑक्टोबर 2026 रोजी 36 हजार 687 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानपूर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक साहित्याचे वाटप नांदेड येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये करण्यात आले. मतदान प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व शांततेत पार पडावी, यासाठी प्रशासनाने आवश्यक नियोजन केले आहे.

जिल्ह्यातील 120 मतदान केंद्रांसाठी 120 मतदान केंद्राध्यक्ष आणि त्यांच्या सहाय्यासाठी 630 मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दि. 22 ऑक्टोबर रोजी प्रशिक्षण देण्यात येत असून, मतदान साहित्याचे वाटप करून त्यांना संबंधित मतदान केंद्रांवर रवाना करण्यात आले आहे. मतदान प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी 55 क्षेत्रीय अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

 

सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान

 

शुक्रवार, दि. 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे. मतदानाची वेळ संपल्यानंतर सर्व मतदान पथके मतदानपेट्या सीलबंद करून नांदेड येथील शासकीय तंत्रनिकेतनमधील सुरक्षित कक्षात जमा करतील. त्यानंतर सर्व मतदानपेट्या पोलीस बंदोबस्तात छत्रपती संभाजीनगर येथील सुरक्षित कक्षात नेऊन जमा करण्यात येणार आहेत. या प्रक्रियेच्या समन्वयासाठी देगलूरचे उपविभागीय अधिकारी अनुप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मतदान प्रक्रिया निर्भय, निष्पक्ष व सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी नांदेड जिल्ह्यातील सर्व पदवीधर मतदारांना शुक्रवार, दि. 23 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क आवर्जून बजावण्याचे आवाहन केले आहे.

******* 



No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक नांदेड जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी शांततेत मतदान सायंकाळी ४ वाजेपर्यंत अंदाजे ५९.८१ टक्के मतदान ;  ३६ हजार ६८७ मतदारांपैकी ...