वृत्त क्रमांक
वादग्रस्त धार्मिक स्थळाच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
23 ऑक्टोबर ते 22
नोव्हेंबरपर्यंत कलम 163 लागू
- नागरिकांनी प्रशासनास
सहकार्य करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 22 : महानुभाव पंथीय व मुस्लिम समाजामध्ये वाद निर्माण झालेल्या नांदेड
ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे ब्रह्मपुरी येथील वादग्रस्त धार्मिक
स्थळाच्या परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा
संहिता-2023 च्या कलम 163 अन्वये
प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. दि. 23 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 6 वाजेपासून दि. 22 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.
मौजे ब्रह्मपुरी येथील गट क्रमांक 44/1 व 44/2 जवळील गोदावरी नदीच्या पात्रालगत असलेल्या
खडकाच्या दगडांच्या जागेवर पूजा-अर्चा करण्यावरून दोन्ही समाजांमध्ये वाद निर्माण
झाला आहे. सदर जागेबाबत दोन्ही समाजांकडून वेगवेगळे दावे करण्यात आले असून,
यापूर्वीही या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी तणावाची
परिस्थिती निर्माण झाल्याचे निदर्शनास आले आहे.
आगामी काळात महानुभाव पंथाचे विविध
धार्मिक सण व उत्सव असून, या कालावधीत मोठ्या संख्येने भाविक
दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणी गर्दी होऊन कायदा व
सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक
उपाय म्हणून हा आदेश जारी करण्यात आला आहे.
प्रतिबंधित क्षेत्राच्या पूर्वेस वाजेगाव
कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड-देगलूर मार्गावरील जुना
पूल, दक्षिणेस गोदावरी नदीचे पात्र आणि उत्तरेस
चिल्ला/दर्ग्याची संरक्षण भिंत अशी सीमा निश्चित करण्यात आली आहे.
या परिसरात दि. 23 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 6
वाजेपासून दि. 22 नोव्हेंबर 2026 रोजी
रात्री 12 वाजेपर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-2023 च्या कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू
राहतील.
संबंधित परिसरात अनधिकृतरीत्या प्रवेश
करणे, धार्मिक कार्यक्रम आयोजित करणे अथवा गर्दी करून तणाव
निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करू नये. नागरिकांनी कायदा
व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे
आवाहन करण्यात आले आहे.
हा आदेश पोलीस अधीक्षक, नांदेड डॉ. निलाभ रोहण यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-2023 च्या कलम 163(2) अन्वये जारी
केला आहे.
******
No comments:
Post a Comment