Thursday, October 22, 2026

 वृत्त क्रमांक

सावरगाव माळ येथे पशुधनाच्या पाणीटंचाईची अधिकाऱ्यांकडून पाहणी

 

  • पशुधनाला पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबविण्याबाबत मार्गदर्शन

 

नांदेड, दि. 22 : भोकर तालुक्यातील सावरगाव माळ येथे पशुधनासाठी निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी पशुधनाला पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करून देणे आणि टंचाई निवारणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या पाहणीवेळी जिल्हा उपआयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. सखाराम खुणे, पंचायत समिती भोकरचे गटविकास अधिकारी शेखर देशमुख, भोकरचे नायब तहसीलदार आणि पशुधन विकास अधिकारी डॉ. अविनाश बुन्नावार उपस्थित होते.

या पाहणीदरम्यान पशुधनासाठी पिण्याच्या पाण्याची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करणे, पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर तातडीच्या उपाययोजना राबविणे तसेच भविष्यातील पाणीटंचाईचे निवारण करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यासाठी संबंधित विभागांनी परस्पर समन्वयातून आवश्यक कार्यवाही करावी, असे मार्गदर्शन करण्यात आले.

पशुधनाचे संरक्षण आणि त्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देऊन पाणीटंचाई निवारणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर यावेळी भर देण्यात आला.

******* 




No comments:

Post a Comment

भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताह ११ ते १८ नोव्हेंबर २०२६ राज्यभर विविध उपक्रम #भगवानबिरसामुंडा #आदिवासीविकास #महाराष्ट्रशासन #Ma...