Thursday, October 22, 2026

 वृत्त क्रमांक

जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू

 

नांदेड, दि. 22 : जिल्ह्यात सलग विविध धार्मिक कार्यक्रम, मोर्चे, आंदोलने व रॅलींची रेलचेल असतानाच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांकडून आंदोलनाची शक्यता आणि विविध सामाजिक मागण्यांवरून संघर्षाची संभाव्यता लक्षात घेता नांदेड जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा मोठा निर्णय घेतला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी किरण अंबेकर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये संपूर्ण नांदेड जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदीचे आदेश जारी केले आहेत.

हा आदेश दि. 24 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 6 वाजेपासून दि. 7 नोव्हेंबर 2026 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण नांदेड जिल्ह्यात लागू राहील.

जिल्ह्यातील आगामी विविध कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निदर्शनास आणून दिली आहे. दि. 22 ते 24 ऑक्टोबरदरम्यान गुरुद्वारा माता साहेब, मुगट येथे माता देवजी यांच्या जन्मोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, या कार्यक्रमास शिख समाजबांधवांसह बाहेरील राज्यांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

दि. 24 ऑक्टोबर रोजी अर्धापूर येथे अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि. 25 ऑक्टोबर रोजी वटफळी, ता. हिमायतनगर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भीमगीतांचा तिरंगी सामना, नांदेड शहर व जिल्ह्यात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, तसेच महाविहार, बावरी नगर, दाभड, ता. अर्धापूर येथे वर्षावास समापन, कठीण चीवरदान, पवारणा, महापरित्राण पाठ व धम्मदेसना महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. 2 नोव्हेंबर रोजी उमरी येथे अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात मोर्चा व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय जिल्ह्यात विविध समाजांच्या आरक्षणासंदर्भातील मागण्या, इतर विविध मागण्या तसेच दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व शेतकरी संघटनांकडून आंदोलने, मोर्चे व रॅली होण्याची शक्यता आहे.

आदेशानुसार नांदेड जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी किंवा त्याच्या आसपास पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन आदेशात नमूद केलेली कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे.

सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे, तलवारी, सोटे, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बाळगता येणार नाही. तसेच दाहक अथवा स्फोटक पदार्थ, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे तसेच ती फेकण्यासाठीची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे अथवा तयार करणे प्रतिबंधित करण्यात आले आहे.

जाहीरपणे घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे, तसेच सभ्यता, नीतिमत्ता, राज्याची सुरक्षितता व शांततेस बाधा पोहोचविणारी किंवा कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करणारी प्रक्षोभक भाषणे, हावभाव, सोंग, चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर साहित्य तयार करणे, प्रदर्शित करणे अथवा त्याचा सार्वजनिक प्रसार करण्यासही मनाई करण्यात आली आहे.

हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी किंवा इतर शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा तसेच सक्षम प्राधिकाऱ्याने विशेष परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू राहणार नाही. अशा कार्यक्रमांसाठी तसेच पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येणे, सभा, मिरवणूक, मोर्चा काढणे आणि ध्वनीक्षेपक वापरण्यास परवानगी देण्याचे अधिकार संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तसेच पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना राहतील.

हा आदेश बहुसंख्य नागरिकांना लागू असल्याने त्याची दवंडी, ध्वनीक्षेपक तसेच इतर प्रसिद्धी माध्यमांद्वारे व्यापक प्रसिद्धी करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक, नांदेड यांना देण्यात आले आहेत. तसेच आदेशाच्या प्रती जिल्ह्यातील सर्व उपविभागीय दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी आणि पोलीस ठाण्यांच्या कार्यालयातील सूचना फलकांवर लावून प्रसिद्धी देण्यात येणार आहे.

*****

No comments:

Post a Comment

भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताह ११ ते १८ नोव्हेंबर २०२६ राज्यभर विविध उपक्रम #भगवानबिरसामुंडा #आदिवासीविकास #महाराष्ट्रशासन #Ma...