वृत्त क्रमांक
मातासाहिब देवांजी यांच्या 345 व्या जन्मोत्सवानिमित्त विशेष पशुवैद्यकीय आरोग्य शिबिर
- मुगट येथे देशभरातून आलेल्या घोडे व हत्तींच्या आरोग्य तपासणीसह
उपचारांची व्यवस्था
नांदेड, दि. 22: मातासाहिब देवांजी यांच्या 345 व्या जन्मोत्सव
सोहळ्यानिमित्त मुदखेड तालुक्यातील मुगट येथील गुरुद्वारा परिसरात पशुसंवर्धन
विभाग, नांदेड यांच्या वतीने विशेष पशुवैद्यकीय आरोग्य
शिबिराची व्यवस्था करण्यात आली आहे. देशाच्या विविध भागांतून या सोहळ्यासाठी
आलेल्या घोडे व हत्तींची आरोग्य तपासणी करून आवश्यक उपचार उपलब्ध करून देण्यासाठी
औषधसाठा आणि पुरेसे मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे.
या अनुषंगाने आज गुरुवार, दि. 22 ऑक्टोबर 2026 रोजी शिबिरस्थळी भेट देऊन पशुवैद्यकीय सेवांसाठी करण्यात आलेल्या
व्यवस्थेची पाहणी करण्यात आली. धार्मिक सोहळ्यात सहभागी प्राण्यांचे आरोग्य चांगले
राहावे आणि त्यांना वेळेवर आवश्यक उपचार मिळावेत, यासाठी
विभागामार्फत आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.
यावेळी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय
विभागाचे जिल्हा उपआयुक्त डॉ. सखाराम खुणे, सहाय्यक
आयुक्त डॉ. प्रविणकुमार घुले, मुदखेडच्या सहाय्यक आयुक्त डॉ.
निलाक्षी जगताप, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणिता पेंडकर व
डॉ. गुलाम मुख्तदिर, मुगटचे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी
बाळासाहेब इंगोले यांच्यासह उपचारविषयक कर्मचारी व परिचर उपस्थित होते.
मुदखेड तालुक्यातील सर्व पशुवैद्यकीय
अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या सोहळ्यात सहभागी प्राण्यांसाठी आवश्यक
पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्राण्यांचे आरोग्य व कल्याण
सुनिश्चित करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने विशेष दक्षता घेतली आहे.
******

No comments:
Post a Comment