Thursday, October 22, 2026

 वृत्त क्रमांक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी प्रसिद्ध

 

  • नांदेड जिल्ह्यातील 4 हजार 161 शेतकरी पात्र
  • जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 2 हजार 73 शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणासाठी याद्या प्रसिद्ध
  • पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करावे
  • मयत व ज्येष्ठ लाभार्थ्यांसाठीही कार्यपद्धती

 

 

नांदेड, दि. 22 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील 4 हजार 161 पात्र शेतकऱ्यांची चौथी यादी आज गुरुवार, दि. 22 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 2 लाख 2 हजार 73 पात्र शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणासाठी याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र शासनाने दि. 2 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दि. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत वितरित झालेल्या आणि दि. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या, तसेच दि. 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेल्या पीक कर्ज व पुनर्गठित किंवा फेरपुनर्गठित कर्जासाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.

योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून, यासाठी शासनाने महाआयटीची नियुक्ती केली आहे. योजनेच्या पोर्टलवर नांदेड जिल्ह्यातील बँकांनी एकूण 2 लाख 24 हजार 847 थकीत कर्ज खात्यांची माहिती अपलोड केली आहे. संगणकीय प्रक्रियेनंतर यापूर्वी दि. 24 जुलै, 11 सप्टेंबर आणि 12 ऑक्टोबर 2026 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या तीन याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. आता चौथी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

चौथ्या यादीतील पात्र 4 हजार 161 शेतकऱ्यांची यादी संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही यादी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची असून, संबंधित लाभार्थ्यांनी आपल्या कर्ज खात्यावरील दि. 31 मार्च 2026 रोजीची थकबाकी तपासून नजीकच्या आपले सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे.

या यादीतील काही शेतकऱ्यांनी एकापेक्षा अधिक बँकांकडून पीक कर्ज घेतलेले आहे. शेतकऱ्यांच्या कर्ज थकबाकीची गणना दि. 31 मार्च 2026 रोजीच्या स्थितीनुसार करण्यात आली आहे. दि. 1 एप्रिल 2026 नंतरचे व्याज व इतर खर्च माफ करण्यात येणार आहेत. तसेच, राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांमधील काही कर्ज खात्यांची थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असली, तरी शासनाच्या ‘हेअर कट’ धोरणानुसार ही कर्जे निरंक करण्यात येणार आहेत.

योजनेतील पात्र लाभार्थ्यांपैकी मयत झालेले, वयोवृद्ध तसेच बोटांचे ठसे नोंदविण्यात अडचण येणाऱ्या लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी दि. 19 ऑगस्ट 2026 रोजी मानक कार्यप्रणाली (एसओपी) निर्गमित करण्यात आली आहे. आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी आपली यादीतील नोंद तपासून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक शाहुराज हिरे यांनी केले आहे.

******* 



2 comments:

  वृत्त   मतपेट्या, मतदान साहित्यासह पथके केंद्रांकडे रवाना ०५ - औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक : आठही जिल्ह्यांत मतदान साहित्याचे व...