वृत्त क्रमांक
‘एक दिवस, एक तास, एक साथ’ उपक्रमातून नांदेड जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर
• हजारो नागरिकांचा सहभाग; गावोगावी स्वच्छता मोहीम
नांदेड (जिमाका), दि. 01 : स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत आयोजित ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ या उपक्रमाला नांदेड जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील गावागावांत व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
पंचायत समित्या, ग्रामपंचायती, शाळा, अंगणवाडी, महाविद्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे तसेच विविध सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. अनेक ठिकाणी स्वच्छतेची शपथ घेऊन मोहिमेला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी झाडू हातात घेत स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला.
या उपक्रमात महाविद्यालयीन युवक, शालेय विद्यार्थी, महिला, महिला बचत गट, युवक मंडळे, ग्रामपंचायत कर्मचारी व अधिकारी, स्वयंसेवी संस्था तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. अनेकांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत आपल्या परिसरातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ केली. विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा संकलित करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.
या मोहिमेमुळे सार्वजनिक ठिकाणे, शासकीय कार्यालये, शाळा आणि ग्रामपंचायत परिसर स्वच्छ झाले. तसेच स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण झाली. ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम केवळ एक दिवसापुरता मर्यादित न राहता स्वच्छता ही दैनंदिन जीवनशैली बनावी, यासाठी नागरिकांनी सातत्याने सहभाग नोंदवावा, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिकांच्या सामूहिक सहभागातून नांदेड जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ उपक्रमाला व्यापक लोकसहभाग मिळाला.
***
No comments:
Post a Comment