वृत्त क्रमांक
ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मान, हक्क व आरोग्यासाठी नांदेड येथे विशेष कार्यशाळा
• जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त नांदेड येथे ज्येष्ठ नागरिक कार्यशाळा संपन्न
• आरोग्य तपासणीसह विविध विषयांवर मार्गदर्शन
नांदेड (जिमाका), दि. 01 : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, नांदेड आणि महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम), मराठवाडा प्रादेशिक विभाग (उत्तर), नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक कार्यशाळेचे येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेलया नियोजन भवन येथे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी संजीव मोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव शरद देशपांडे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व आदर करण्याबाबत उपस्थितांनी सामूहिक शपथ घेतली.
समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी प्रास्ताविकात ‘मातृ देवो भव, पितृ देवो भव’ ही भारतीय संस्कृतीची शिकवण असून ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगितले. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाच्या विविध पेन्शन योजनांची माहिती दिली. तसेच मुख्यमंत्री वयोश्री योजना आणि मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेबाबत शासनाच्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले. विविध शासकीय विभाग व बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या कामांना प्राधान्य देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त निलेश सुकेवार यांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती दिली. शहरात चार विरंगुळा केंद्रे, विविध ठिकाणी वाचन कट्टे तसेच महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधांची माहिती त्यांनी दिली.
जिल्हा अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक बी. जी. सोनकांबळे यांनी ज्येष्ठ नागरिकांना बँकिंग व्यवहारात अडचणी येऊ नयेत यासाठी बँकांना आवश्यक सूचना देण्यात आल्याचे सांगितले. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देणे तसेच निवृत्तीवेतनधारकांना हयातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत माहिती दिली. डिजिटल फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन करत कोणत्याही व्यक्तीस ओटीपी देऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
फिजिओथेरपी तज्ज्ञ डॉ. सुमेधकुमार वाघमारे यांनी ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करत सुलभ व्यायामाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. समुपदेशक ज्योती पिंपळे यांनी अवयवदान, नेत्रदान व देहदानाबाबत माहिती दिली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. उपस्थित ज्येष्ठ नागरिकांची रक्तदाब व रक्तातील साखरेची तपासणी करण्यात आली.
महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे उपाध्यक्ष अशोक तेरकर यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रश्नांवर मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिकांना सन्मानपूर्वक व सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी विविध उपक्रम व योजनांमध्ये त्यांचा सहभाग वाढविण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय समारोपात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे यांनी नव्या पिढीने ज्ञान, विज्ञान आणि संस्कारांची जोपासना करण्याबरोबरच घरातील ज्येष्ठांचा सन्मान केला पाहिजे, असे सांगितले. ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर तरतुदींची माहिती असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या भगीरथी बच्चेवार, नाम फाऊंडेशनचे भाऊराव मोरे, ज्येष्ठ विधिज्ञ एम. झेड. सिद्दीकी, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. खान, ज्येष्ठ नागरिक महिला आघाडीच्या अध्यक्ष निर्मला भोसकर (कोरे), समाजकल्याण अधिकारी गजानन नरवाडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन पांपटवार यांनी केले. आभार प्रदर्शन समाजकल्याण अधिकारी गजानन नरवाडे यांनी केले. सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण शिवानंद मिनगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यशाळेस जिल्ह्यातील सुमारे 400 ते 500 ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदविला.
**
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment