वृत्त क्रमांक
महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत बोरगाव येथे महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणी शिबिर
• महिला शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी केले मार्गदर्शन
नांदेड(जिमाका), दि. 01 : महिलांना कृषी क्षेत्रात स्वावलंबी व सक्षम करण्यासाठी तसेच त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत भोकर तालुक्यातील मौजे बोरगाव येथे महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात महिला शेतकऱ्यांची ऑनलाईन तसेच प्रत्यक्ष नोंदणी करून महिला शेतकरी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात आली.
या शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी उपकृषी अधिकारी रवी तांडे यांनी महिला सक्षमीकरण अभियान आणि त्याअंतर्गत महिलांना उपलब्ध असलेले कायदेशीर व प्रशासकीय अधिकार याबाबत मार्गदर्शन केले. महिलांनी कृषी क्षेत्रातील विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
मंडळ कृषी अधिकाऱ्यांनी उपस्थित महिला शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषीविषयक योजनांची माहिती देऊन त्यांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच योजनांशी संबंधित आवश्यक सेवा व मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले.
यावेळी गावातील नागरिक आनंदराव पाटील, गजानंदराव जाधव यांच्यासह इतर मान्यवर तसेच बोरगाव परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शिबिरामुळे महिला शेतकऱ्यांमध्ये शासकीय योजनांची माहिती आणि त्यांचा लाभ घेण्याबाबत उत्साह निर्माण झाला.
शिबिराचे प्रास्ताविक व नियोजन सहायक कृषी अधिकारी सी. बी. इरलेवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी विभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
**
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment