Thursday, October 1, 2026

 वृत्त क्रमांक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या 

तिसऱ्या टप्प्यात नांदेड जिल्ह्यातील 37 हजार 959 शेतकऱ्यांना 373.38 कोटींचा लाभ

नांदेड(जिमाका), दि. 01  : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत कर्जमाफीच्या लाभ वितरणाच्या तिसऱ्या टप्प्यात नांदेड जिल्ह्यातील आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या 37 हजार 959 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर 373.38 कोटी रुपये आज थेट हस्तांतरित करण्यात आले. या योजनेच्या आतापर्यंतच्या तीन टप्प्यांत जिल्ह्यातील आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या एकूण 1 लाख 2 हजार 218 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना 861.56 कोटी रुपयांचा कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे.

या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या दोन याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्यामध्ये एकूण 1 लाख 43 हजार 719 शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यापैकी आतापर्यंत 1 लाख 10 हजार 46 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या पात्र लाभार्थ्यांपैकी 1 लाख 2 हजार 218 शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर एकूण 861.56 कोटी रुपयांची कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. 

पालकमंत्री अतुल सावे आणि जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यात योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीतील अद्याप आधार प्रमाणीकरण पूर्ण न केलेल्या पात्र शेतकऱ्यांनी जवळच्या ‘आपले सरकार’ सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड यांच्यामार्फत करण्यात आले आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर योजनेच्या निकषानुसार पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यावर लाभाची रक्कम थेट वर्ग करण्यात येणार आहे.

दिनांक 2 जून 2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, 2026’ या योजनेस मान्यता देण्यात आली. त्यानुसार 2 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे ही योजना जाहीर करण्यात आली असून, 15 जुलै 2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये योजनेच्या काही निकषांमध्ये अंशतः सुधारणा करण्यात आली आहे.

योजनेतील कर्जमुक्ती व एकवेळ समझोता (OTS) या घटकांच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील 30 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, 12 राष्ट्रीयकृत बँका तसेच इतर खासगी बँका अशा एकूण 53 बँकांनी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती महाआयटीमार्फत विकसित करण्यात आलेल्या पोर्टलवर अपलोड केली आहे. विविध बँकांकडून सुमारे 32 लाख कर्जखात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. 

योजनेच्या निकषानुसार पात्र ठरलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांपैकी सुमारे 20.15 लाख शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यापैकी 30 सप्टेंबर 2026 अखेर 17.21 लाख कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. यापूर्वी आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या सुमारे 12.58 लाख पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यावर 10 हजार 115 कोटी रुपये ऑनलाइन पोर्टलद्वारे थेट हस्तांतरित करण्यात आले होते. त्यानंतरच्या टप्प्यात 3.27 लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर 3 हजार 161 कोटी रुपयांचा लाभ वितरित करण्यात आला. अशा प्रकारे आतापर्यंत राज्यात एकूण 15.86 लाख कर्जखात्यांवर 13 हजार 276 कोटी रुपयांचा लाभ वितरित करण्यात आला आहे.

आजअखेर वितरित झालेल्या 13 हजार 276 कोटी रुपयांच्या लाभामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील 6.27 लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर 5 हजार 124 कोटी रुपये, अमरावती विभागातील 3.65 लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर 3 हजार 210 कोटी रुपये, नागपूर विभागातील 1.41 लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर 1137 कोटी रुपये, नाशिक विभागातील 2.48 लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर 2174 कोटी रुपये, पुणे विभागातील 1.72 लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर 1443 कोटी रुपये आणि कोकण विभागातील 0.31 लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर 188 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत.

योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत सर्व बँकांना शासनामार्फत निर्देश देण्यात आले आहेत.

***

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक चारा साक्षरता अभियानांतर्गत आज रामतीर्थ येथे निकृष्ट चारा सकस करण्याचे प्रात्यक्षिक • पशुपालकांनी या प्रात्यक्षिकाचा लाभ घ...