Thursday, October 1, 2026

वृत्त क्रमांक

दुष्काळसदृश्य परिस्थितीत पाण्याचे काटेकोर नियोजन करा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

• धरणातील पाणीसाठा, पिण्याचे पाणी आरक्षण व पीक परिस्थितीचा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी घेतला आढावा

• पीक कापणी प्रयोग व पंचनामे अचूक करण्याच्या सूचना

नांदेड (जिमाका), दि. 01 : जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळसदृश्य परिस्थिती आणि आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करावे. धरणातील पाणीसाठा व पिण्याच्या पाण्यासाठी करण्यात आलेल्या आरक्षणाचा नियमित आढावा घेऊन पाणीटंचाई निवारणासाठी आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीची बैठक झाली. यावेळी जिल्ह्यातील सद्यस्थितीतील पर्जन्यमान, पिकांची परिस्थिती, धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा, पिण्याच्या पाण्याचे आरक्षण, संभाव्य पाणीटंचाई तसेच दुष्काळ निवारणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता इ. म. चिश्ती, नांदेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण थोरात, सी. आर. बनसोड, वरिष्ठ भूवैज्ञानिक एस. पी. राठोड, लेंडी प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता प्रणव मुदगल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे प्रतिनिधी व शास्त्रज्ञ, जिल्हा नियोजन अधिकारी, कापूस संशोधन केंद्राचे सहयोगी प्राध्यापक यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्याचा आढावा घेताना अनधिकृत पाणी कनेक्शनवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक असून धरणातील पाण्याच्या भरवशावर शेतकऱ्यांकडून पेरणी केली जाणार नाही, याची संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी. पाण्याची उपलब्धता आणि पिकांच्या गरजा लक्षात घेऊन शेतकऱ्यांना वस्तुनिष्ठ माहिती व आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने पीक कापणी प्रयोग आणि नुकसानीचे पंचनामे अत्यंत अचूक व वस्तुनिष्ठ पद्धतीने करावेत. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्राची पाहणी करून वस्तुस्थितीच्या आधारे नोंदी कराव्यात. या कामात कोणत्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.

दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे नागरिकांना निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन सर्व विभागांनी संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने काम करावे. टंचाई आराखड्यात आवश्यक उपाययोजनांचा समावेश करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी. पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेला सर्वोच्च प्राधान्य देऊन भविष्यातील गरजांचा विचार करून नियोजन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीत धरणांच्या किरकोळ दुरुस्तीची कामे, जलतारा तसेच पाणी उपलब्धता वाढविण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. पाणीटंचाई निर्माण होण्यापूर्वीच आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या.

अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी उपस्थित राहून नागरिकांना आवश्यक शासकीय सेवा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात. स्थानिक पातळीवर निर्माण होणाऱ्या समस्यांवर तातडीने कार्यवाही करून वरिष्ठ कार्यालयास त्याची माहिती द्यावी, असेही जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी निर्देशित केले.

**





No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक येरगी ग्रामसभेत व रिफॉर्म उत्सवात केंद्रीय सहसचिव पी. नरहरी यांचा सहभाग ग्रामस्थांशी संवाद साधत शाश्वत ग्रामविकासासाठी केले मा...