वृत्त क्रमांक
सेवा संकल्प अभियानात 31 अंगणवाड्यांचे शाळांशी जोडणी
नांदेड (जिमाका), दि. 01 : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या मार्गदर्शक सूचनांनुसार अंगणवाडी केंद्रांना नजीकच्या शाळांशी जोडण्याच्या उपक्रमांतर्गत नांदेड शहरातील 31 अंगणवाड्यांचे जिल्हा परिषद व खासगी शाळांशी स्थलांतर व जोडणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सेवा संकल्प अभियानांतर्गत ही कार्यवाही करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली 10 सप्टेंबर 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे अंगणवाडी केंद्रांच्या स्थलांतराबाबत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीस नांदेड महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या शाळांचे मुख्याध्यापक तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी उपस्थित मुख्याध्यापकांशी संवाद साधून शाळांमधील उपलब्ध व रिकाम्या वर्गखोल्या अंगणवाडी केंद्रांसाठी उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियानात नांदेड शहरातील 31 अंगणवाडी केंद्रांना शाळांशी जोडण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
अंगणवाडी व शाळा यांच्यातील समन्वय वाढवून बालकांना पूर्वप्राथमिक व प्राथमिक शिक्षणाचा सलग अनुभव मिळावा, तसेच उपलब्ध शैक्षणिक पायाभूत सुविधांचा प्रभावी वापर व्हावा, या उद्देशाने ही कार्यवाही करण्यात आली आहे, अशी माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नांदेड शहर यांच्या वतीने देण्यात आली आहे.
00000
No comments:
Post a Comment