Friday, October 23, 2026

वृत्त क्रमांक

नांदेड जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी शांततेत मतदान

सायंकाळी ४ वाजेपर्यंत अंदाजे ५९.८१ टक्के मतदान ; 

३६ हजार ६८७ मतदारांपैकी २१ हजार ९४२ मतदारांचा सहभाग

नांदेड, दि. २३ ऑक्टोबर : ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नांदेड जिल्ह्यात आज २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झालेली मतदान प्रक्रिया सायंकाळी ४ वाजेपर्यंत शांततेत व सुरळीत पार पडली. जिल्ह्यातील सर्व १२० मतदान केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. सायंकाळी ४ वाजेपर्यंत जिल्ह्यात अंदाजे ५९.८१ टक्के मतदानाची नोंद झाली.

जिल्ह्यात सकाळी ८ ते १० या वेळेत ७.५४ टक्के, दुपारी १२ वाजेपर्यंत २१.२० टक्के, तर दुपारी २ वाजेपर्यंत ३७.४३ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मतदानाचा टक्का वाढत सायंकाळी ४ वाजेपर्यंत ५९.८१ टक्क्यांवर पोहोचला. संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि शांततेत पार पडली.

जिल्ह्यातील मतदार यादीत एकूण ३६ हजार ६८७ मतदारांची नोंद होती. त्यापैकी २१ हजार ९४२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये २८ हजार ६९४ पुरुष मतदारांपैकी १८ हजार १८० पुरुषांनी, तर ७ हजार ९९० महिला मतदारांपैकी ३ हजार ७६१ महिलांनी मतदान केले. तसेच तीन इतर मतदारांपैकी एका मतदाराने मतदान केले. महिला मतदारांच्या तुलनेत पुरुष मतदारांचा सहभाग अधिक राहिला.

जिल्हाधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रांची पाहणी

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सकाळी प्रतिभा निकेतन महाविद्यालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि यशवंत महाविद्यालय येथील मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. 

मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व मतदान केंद्रांवरील मतपेट्या आणि निवडणुकीचे साहित्य जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजकुमार माने यांच्यासह जिल्हा प्रशासनातील संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

0000









No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक नांदेड जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी शांततेत मतदान सायंकाळी ४ वाजेपर्यंत अंदाजे ५९.८१ टक्के मतदान ;  ३६ हजार ६८७ मतदारांपैकी ...