वृत्त क्रमांक
अमृत दुर्गोत्सव 2026 उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा
• गड-दुर्गांच्या प्रतिकृती निर्मितीतून दुर्गसंवर्धनाविषयी जनजागृती करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 22 : महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या माध्यमातून राज्यभरात ‘अमृत दुर्गोत्सव 2026’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गड-दुर्गांच्या प्रतिकृती तयार करण्याच्या लोकपरंपरेला प्रोत्साहन देणे आणि दुर्गसंवर्धनाविषयी जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या दुर्गोत्सवाच्या माध्यमातून राज्यातील सर्व स्तरांतील नागरिकांचा सहभाग वाढविणे अपेक्षित आहे. या उपक्रमात नागरिक, विद्यार्थी, युवा वर्ग तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन गड-दुर्गांच्या ऐतिहासिक वारशाच्या जतन व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी योगदान द्यावे.
अमृत दुर्गोत्सव 2026 उपक्रमात जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, शासकीय व अनुदानित शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था तसेच संबंधित विभाग व आस्थापनांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन अमृतच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे. यासाठी संबंधित कार्यालये व संस्थांनी आपल्या अधिनस्त यंत्रणांना आवश्यक सूचना देऊन नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत.
या उपक्रमाच्या आयोजनासंदर्भातील संहिता, वेळापत्रक आणि सविस्तर माहिती www.amrutdurgotsav.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, युवा वर्ग आणि सर्व संबंधित घटकांनी या उपक्रमात स्वयंप्रेरणेने व सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
****

No comments:
Post a Comment