Friday, October 23, 2026

 वृत्त क्रमांक

ध्येय निश्चित करा, सातत्यपूर्ण परिश्रमातून यश मिळवा! -जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

 

  • सार्वजनिक प्रशासन व राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांशी साधला संवाद
  • राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत प्रत्यक्ष प्रशासकीय कामकाजाची ओळख

नांदेड (जिमाका), दि. 23 : विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्यातील ध्येयांचे स्पष्ट निर्धारण करून सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त, स्व-अभ्यास आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या बळावर यश संपादन करावे. केवळ नोकरी मिळविण्यापुरते मर्यादित न राहता समाजपरिवर्तनात सक्रिय योगदान देणारे जबाबदार नागरिक म्हणून स्वतःला घडवावे, असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या 120 तासांच्या प्रत्यक्ष कार्यानुभव प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने सार्वजनिक प्रशासन व राज्यशास्त्र विषयाच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांशी जिल्हाधिकारी कर्डिले यांनी संवाद साधला. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्यातील ध्येय-आकांक्षा जाणून घेत त्यांच्या करिअरविषयक वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.

ध्येयपूर्तीसाठी वाचन, वेळेचे नियोजन आणि सातत्य महत्त्वाचे

विद्यार्थ्यांनी भविष्यात कोणत्या क्षेत्रात करिअर घडवायचे आहे, त्यासाठी कोणती तयारी सुरू आहे आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोणती कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी मुक्तपणे संवाद साधला. विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवा, राजकारण, कायदा, अध्यापन, संशोधन, सामाजिक विकास आणि विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून समाजसेवा करण्याची इच्छा व्यक्त केली.

यावेळी ध्येय निश्चिती, वेळेचे प्रभावी व्यवस्थापन, नियमित वाचन, संवादकौशल्य, नेतृत्वगुण आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सातत्य, शिस्त आणि स्व-अभ्यासाला पर्याय नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी

संवादादरम्यान विद्यार्थ्यांनी प्रशासकीय कामकाज, शासकीय योजना, सार्वजनिक धोरणे, स्पर्धा परीक्षांची तयारी, करिअर विकास आणि लोकाभिमुख प्रशासन यांसंबंधी विविध प्रश्न विचारले. जिल्हाधिकारी कर्डिले यांनी या प्रश्नांना उत्तरे देत प्रशासनाची कार्यपद्धती, लोकसेवेतील संधी आणि जबाबदाऱ्या यांची माहिती दिली.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत राबविण्यात येणारा 120 तासांचा प्रत्यक्ष कार्यानुभव प्रशिक्षण कार्यक्रम विद्यार्थ्यांना प्रशासनाची प्रत्यक्ष ओळख करून देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या माध्यमातून कार्यालयीन कार्यपद्धती, विविध शासकीय विभागांचे कामकाज, योजनांची अंमलबजावणी, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा आणि निर्णयप्रक्रियेचे विविध पैलू समजून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते, असे त्यांनी सांगितले.

व्यावहारिक अनुभवातून सक्षम आणि जबाबदार नागरिक घडणार

या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये संवादकौशल्य, नेतृत्वक्षमता, समस्या निराकरण, विश्लेषणात्मक विचारसरणी आणि व्यावसायिक कार्यसंस्कृती विकसित होण्यास मदत होईल. शैक्षणिक ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळाल्याने विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढण्याबरोबरच त्यांच्यात सामाजिक जबाबदारीची जाणीवही निर्माण होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी कर्डिले यांनी व्यक्त केला.

भविष्यात सार्वजनिक प्रशासन, संशोधन, धोरणनिर्मिती, सामाजिक विकास किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रात कार्य करताना या प्रशिक्षणाचा उपयोग होईल. या संवादामुळे विद्यार्थ्यांना आपल्या करिअरविषयक ध्येयांची दिशा निश्चित करण्यास आणि प्रशासनाच्या प्रत्यक्ष कामकाजाचे स्वरूप समजून घेण्यास मदत झाली.

***** 



No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक नांदेड जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी शांततेत मतदान सायंकाळी ४ वाजेपर्यंत अंदाजे ५९.८१ टक्के मतदान ;  ३६ हजार ६८७ मतदारांपैकी ...