Friday, October 23, 2026

 वृत्त क्रमांक

नांदेड जिल्ह्यात 7 लाख 60 हजार बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याचे उद्दिष्ट 

मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच एचपीव्ही लसीकरणाला गती द्यावी-मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांचे निर्देश

 

  • 27 ऑक्टोबरला राष्ट्रीय जंतनाशक दिन; 3 नोव्हेंबरला पूरक मोहीम
  • एचपीव्ही लसीकरणासह विविध आरोग्य योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर 

नांदेड, दि. 23 : बालकांचे आरोग्य सुदृढ राखणे, पोषणस्तर उंचावणे आणि जंतसंसर्गापासून संरक्षण करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात मंगळवार, दि. 27 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत 01 ते 19 वर्षे वयोगटातील 7 लाख 60 हजार 405 बालके व विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच एचपीव्ही लसीकरणाला गती द्यावी आणि आरोग्यविषयक योजनांबाबत व्यापक जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी दिले.

राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेची पूर्वतयारी, औषधसाठा, लाभार्थ्यांचे नियोजन आणि नियमित लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीत सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून मोहिमेचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

राज्यस्तरीय मार्गदर्शक सूचनांनुसार 27 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन राबविण्यात येणार असून, या दिवशी काही कारणास्तव जंतनाशक गोळी घेऊ न शकलेल्या पात्र बालकांसाठी 3 नोव्हेंबर रोजी पूरक मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत शाळांमध्ये शिकणारी मुले-मुली, महाविद्यालयीन विद्यार्थी, अंगणवाडीतील बालके तसेच शाळाबाह्य मुले-मुली यांचा समावेश असेल. पात्र लाभार्थ्यांना अल्बेंडाझोल 400 मि.ग्रॅ. हे जंतनाशक औषध देण्यात येणार आहे.

जिल्ह्यात ग्रामीण भागातील 5 लाख 84 हजार 997 आणि शहरी भागातील 1 लाख 75 हजार 408 अशा एकूण 7 लाख 60 हजार 405 लाभार्थ्यांची निश्चिती करण्यात आली आहे. मोहिमेसाठी 8 लाख 36 हजार 444 गोळ्यांची आवश्यकता असून, प्रत्यक्षात 8 लाख 46 हजार 94 गोळ्यांचा साठा उपलब्ध आहे. यामध्ये ग्रामीण भागासाठी 6 लाख 43 हजार 751 आणि शहरी भागासाठी 2 लाख 2 हजार 343 गोळ्यांचा समावेश आहे. उपलब्ध औषधसाठ्याचे योग्य वितरण करून प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत औषध पोहोचेल, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जंतनाशक दिन मोहिमेची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आशा व अंगणवाडी कार्यकर्त्यांमार्फत पालकसभा घेणे, शाळा व गावांमध्ये प्रभातफेऱ्या काढणे, बॅनर व पोस्टर्स लावणे, स्थानिक लोकप्रतिनिधींचा सहभाग घेणे आणि वृत्तपत्रे व समाजमाध्यमांतून प्रसिद्धी देणे, अशा उपाययोजना करण्यात येणार आहेत. पालक, शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्यांनी मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जंतनाशक गोळ्या देताना आरोग्य कर्मचारी व शिक्षकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी आणि औषध सेवनावर प्रत्यक्ष देखरेख ठेवावी. वयोगटानुसार औषधाची मात्रा निश्चित करताना अधिकृत मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. लहान बालकांना गोळी चुरडून सुरक्षितपणे द्यावी, तर मोठ्या मुला-मुलींना गोळी चावून खाण्यास द्यावी. औषध घरी नेण्यासाठी देऊ नये. आजारी बालकांना औषध देण्यापूर्वी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. शाळा व अंगणवाड्यांमध्ये संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक दर्शनी भागात लावावेत. औषध सेवनानंतर काही विपरीत लक्षणे जाणवल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी. आवश्यकतेनुसार 104 या टोल फ्री क्रमांकावर किंवा रुग्णवाहिकेसाठी 108 या क्रमांकावर संपर्क साधावा.

बैठकीत नियमित लसीकरण कार्यक्रमासह एचपीव्ही लसीकरणाचाही आढावा घेण्यात आला. एचपीव्ही संसर्गापासून संरक्षण आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांपर्यंत लसीकरणाची माहिती पोहोचविण्याची गरज मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी अधोरेखित केली. सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करावे, पात्र लाभार्थ्यांची नोंद व पाठपुरावा करावा आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून लसीकरणाचा वेग वाढवावा, असे निर्देश त्यांनी दिले.

याशिवाय आभा कार्ड नोंदणी, यू-विन पोर्टलवरील नोंदणी, वंदना कार्ड आणि माहेरघर यांसारख्या विविध आरोग्यविषयक कार्यक्रमांचाही आढावा घेण्यात आला. या कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यावर भर देण्यात आला.

या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) प्रशांत थोरात, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) दत्तात्रय भगवान गिरी, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) माधव सलगर, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वंदना फुटाणे, नांदेड महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत शिंदे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर. डी. रावसाहेब, समाजकल्याण अधिकारी आर. एन. शेंडगे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एस. बुट्टे, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बालरोगशास्त्र विभागप्रमुख डॉ. किशोर राठोड, आयएपी नांदेडचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत कोकडवार यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील प्रत्येक पात्र बालकाला जंतनाशक औषधाचा लाभ मिळावा, यासाठी पालक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या आणि संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. तसेच एचपीव्ही लसीकरणाबाबत जनजागृती करून पात्र लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

******

 

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक नांदेड जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी शांततेत मतदान सायंकाळी ४ वाजेपर्यंत अंदाजे ५९.८१ टक्के मतदान ;  ३६ हजार ६८७ मतदारांपैकी ...