वृत्त क्रमांक
एसआयआर कार्यक्रमांतर्गत सर्व पात्र मतदारांनी गणना पत्रक (ईएफ फॉर्म) भरून द्यावेत- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड, दि. १५ जुलै : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR-2026) कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या माध्यमातून Enumeration Form (EF) चे घरपोच वितरण, संकलन व डिजिटायझेशन करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पात्र मतदाराने आपले नाव प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होण्यासाठी ईएफ (EF) फॉर्म भरून संबंधित बीएलओकडे जमा करणे अनिवार्य आहे.
ईएफ फॉर्म भरून जमा न करणाऱ्या मतदारांचे नाव प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होणार नाही. त्यामुळे प्रत्येक पात्र मतदाराने वेळेत गणनापत्रक भरून निवडणूक विभागास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
ज्या मतदारांची नावे Mapped, Unmapped व Anomalies या प्रवर्गांमध्ये आहेत, त्या सर्व मतदारांनीदेखील ईएफ फॉर्म भरणे आवश्यक आहे. Anomalies प्रवर्गातील मतदारांनी ईएफ फॉर्म भरून दिल्यास त्यांचे नाव प्रारूप मतदार यादीत समाविष्ट केले जाईल. त्यानंतर दावा व हरकतीच्या कालावधीत सुनावणीदरम्यान भारत निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या 11 प्रकारच्या पुराव्यांपैकी आवश्यक पुरावे सादर केल्यानंतर पात्र मतदारांचे नाव अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात येईल.
एसआयआर-२०२६ मोहिमेला अधिक गती देण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी स्वतः विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये क्षेत्रीय भेटी देऊन ईएफ फॉर्मचे वितरण, संकलन व डिजिटायझेशनच्या कामाचा आढावा घेत आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन कामाची गती वाढविण्यावर भर देत आहेत.
दरम्यान, महापालिका आयुक्त तथा अतिरिक्त निवडणूक अधिकारी यांनी ८६-नांदेड उत्तर व ८७-नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या सर्व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची (AERO) बैठक घेऊन महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी, बिल कलेक्टर तसेच इतर कर्मचाऱ्यांनी शहरी भागातील बीएलओंना आवश्यक सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय प्रत्यक्ष क्षेत्रीय भेटी देऊन कामाचा वेग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.
दि. १५ जुलै २०२६ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार नांदेड जिल्ह्यात एकूण २७,७७,०७३ मतदारांपैकी २०,६६,७७१ मतदारांना ईएफ फॉर्मचे वितरण पूर्ण झाले असून, ही टक्केवारी ७४.४२ इतकी आहे. तसेच १२,३९,६९७ ईएफ फॉर्मचे डिजिटायझेशन पूर्ण झाले असून त्याची टक्केवारी ४४.६४ आहे.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील सर्व मतदारांना आवाहन केले आहे की, आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडून (BLO) प्राप्त झालेला ईएफ फॉर्म तात्काळ भरून आवश्यक माहिती अचूकपणे सादर करावी. मतदार यादी अद्ययावत, अचूक व सर्वसमावेशक करण्यासाठी प्रत्येक मतदाराचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र मतदाराने वेळेत ईएफ फॉर्म भरून लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा.
00000
No comments:
Post a Comment