Wednesday, July 15, 2026

वृत्त क्रमांक

निपुण भारत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियोजनबद्ध काम करा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

एआय तंत्रज्ञानाचा शिक्षणात अधिकाधिक वापर करण्यावर भर

नांदेड, दि. १५ जुलै :- निपुण भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी, जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे आणि परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स (PGI) मध्ये नांदेड जिल्ह्याला राज्यात अग्रस्थानी आणण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. बदलत्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा शिक्षण प्रक्रियेत प्रभावी वापर करून शिक्षक व विद्यार्थ्यांना तंत्रस्नेही बनविण्यावर भर द्यावा असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे १४ जुलै रोजी शिक्षण विभागाच्या निपुण भारत अभियानाच्या आढावा बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, विभागीय शिक्षण उपसंचालक दीपक चवणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) चे प्राचार्य अमोल निळेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, डायटचे अधिव्याख्याते, जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख उपस्थित होते.

प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनी केले.

यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने अधिव्याख्याता शिवाजी साखरे यांनी ‘निपुण भारत’ विषयावर सादरीकरण केले. तसेच शाळा भेटी व परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स (PGI) संदर्भात ज्येष्ठ अधिव्याख्याता बालाजी शेळके आणि अधिव्याख्याता डॉ. किरण रापतवार यांनी सादरीकरण केले.

मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाधारित अध्यापनावर भर देण्याच्या सूचना दिल्या. विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण बनविण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी शिक्षण विभागाला दिले.

मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता व भौतिक सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याचे आवाहन केले. तसेच शिक्षकांच्या गरजांनुसार प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याबाबत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेला सूचना दिल्या.

विभागीय शिक्षण उपसंचालक दीपक चवणे यांनी निपुण भारत अभियानातील उद्दिष्टपूर्तीसाठी तसेच पीजीआयमधील सर्व मानके व उपमानकांमध्ये अपेक्षित गुणप्राप्तीसाठी शाळांनी नियोजनपूर्वक काम करण्याचे मार्गदर्शन केले.

बैठकीचे सूत्रसंचालन प्रलोभ कुलकर्णी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार श्रीकांत थगनारे यांनी मानले.

000000




No comments:

Post a Comment

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६ : #कर्जमुक्तीयोजना #कर्जमुक्तीयोजना२०२६ #शेतकरी #महाराष्ट्रशासन