वृत्त क्रमांक
शेतकऱ्यांनो
संधी सोडू नका! फक्त 10 टक्के खर्चात बसवा सूक्ष्म सिंचन संच ; विशेष मोहीम सुरू !
अनुसुचित
जाती व अनुसुचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचन योजना-विशेष
मोहीम
नांदेड दि. 15 जुलै :- सन 2026-27 या आर्थिक वर्षात राष्ट्रीय कृषि विकास योजना “प्रति थेंब अधिक पिक (सूक्ष्म सिंचन)” अंतर्गत अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गाताली शेतकऱ्यांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. मा.कृषि आयुक्तांच्या आदेशानुसार, ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा लाभ मिळवून देण्यासाठी 1 ते 31 जुलै 2026 या कालावधीत जिल्ह्यात विशेष मोहीम राबवली जात आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांनी घ्यावा. इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या अधिकृत महाडीबीटी पोर्टलवर खालील संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी व अर्ज सादर करावे, त्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin या संकेतस्थळावर भेट द्यावी.
शेतकऱ्यांनी अर्ज सादर करताना सर्व माहिती अत्यंत अचूक भरावी, अन्यथा अर्ज रद्द होण्याची शक्यता असते. या पोर्टलवर 'प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करताना शेतकऱ्यांकडे अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी, ओळख पडताळणीसाठी आवश्यक शासकीय कागदपत्रे, बँक पासबुक आणि जातीचा दाखला असणे अनिवार्य आहे.
सदर योजने अंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना 55 टक्के आणि इतर शेतक-यांना 45 टक्के अनुदान देय असून क्षेत्राची मर्यादा 5 हेक्टर पर्यंत आहे. राज्य पुरस्कृत मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजने अंतर्गत प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना-प्रती थेंब अधिक पीक योजनेतून लाभ घेतलेल्या अल्प व अत्यल्प भुधारक शेतक-यांना 25 टक्के आणि इतर शेतकऱ्यांना 30 टक्के पुरक अनुदान देऊन योजने अंतर्गत एकूण अनुक्रमे 80 टक्के व 75 टक्के अनुदान देण्यात येत आहे. अनुसुचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना उर्वरीत 10 टक्के अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व अनुसुचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 15 टक्के अनुदान बिरसा मुंडा कृषि क्रांती योजने मधुन अदा करण्यात येते. अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना असे एकूण 90 टक्केच्या मर्यादित अनुदान देण्यात येत आहे.
अधिक
माहितीसाठी तसेच ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत मदतीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या परिसरातील
सामूहिक सेवा केंद्र (सीएससी), सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी
अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि
अधिकारी श्री दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment