Tuesday, April 18, 2023

 मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144  

नांदेड (जिमाका) दि. 18 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून गुरुवार 20 एप्रिल 2023 चे सकाळी 6 वाजेपासून ते 19 मे 2023 चे मध्यरात्री पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत. 

 

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूर कडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा  20 एप्रिल 2023  रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 मे 2023  रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी घोषित केले आहे.  

 

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

 विद्यार्थ्यांनी आवश्यक दाखले

व प्रमाणपत्र वेळेत काढून घेण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 18 :- इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी विविध दाखल्यांची आवश्यकता असते. निकालानंतर प्रवेशासाठी कालावधी मर्यादित असतो. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आवश्यक असलेली दाखले व प्रमाणपत्र वेळेत काढून घेण्यासाठी सेतु सुविधा केंद्रामार्फत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे.

 

तहसिल कार्यालयामार्फत उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलियर प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र, भूमिहिन प्रमाणपत्र इ. दाखले वितरीत करण्यात येतात. निकालानंतर पुढील प्रवेशासाठी असणारा मर्यादित कालावधी, त्याच वेळी तहसिल कार्यालयात विविध दाखल्यासाठी प्राप्त होणाऱ्या अर्जाचे प्रमाण मोठया प्रमाणात असते. त्यामुळे सर्व अर्जाची तपासणी करण्यास वेळ लागतो. केलेल्या अर्जात काही त्रुटी असल्यास त्याची पुर्तता करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. तसेच सेतु केंद्रामार्फत मोठया प्रमाणात प्रमाणपत्रांची आवक वाढून ऑनलाईन प्रमाणपत्र ज्या सर्व्हरद्वारे देण्यात येतात ते सर्व्हर युजर्सच्या संख्या जास्त असल्यामुळे हँग होणे, स्लो होणे अशा अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढील प्रवेशासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्रासाठी तात्काळ अर्ज करुन वेळेआधीच प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावेत, असे तहसिल कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.  

 

मागील आर्थिक वर्षात 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 कालावधीत तहसिल कार्यालयामार्फत उत्पन्न प्रमाणपत्र 39 हजार 573, रहिवासी दाखला 4 हजार 812, वय अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र 13 हजार 100 व इतर प्रमाणपत्र 16 हजार 687 असे एकूण 74 हजार 172 प्रमाणपत्र उपविभागीय अधिकारी व तहसिलदार नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली नायब तहसिलदार काशिनाथ डांगे, अव्वल कारकून विद्यासागर पिंलगुडे, तलाठी गणेश जोंधळे यांनी प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत.

0000

 

Wednesday, April 12, 2023

 सुधारित वृत्त 

फुले शाहू आंबेडकरी जलसा 2023

कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

·  आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न  

 

नांदेड (जिमाका) दि. 12 :-  फुले शाहू आंबेडकर यांचे विचार जनसामान्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य विभागातर्फे नांदेड येथे तीन दिवसीय फुले शाहू आंबेडकरी जलसा 2023 ला नांदेडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तक्षशीला बुद्धविहार मैदान  जंगमवाडी येथील प्रांगणावर या कार्यक्रमाचे 11 एप्रिल रोजी सायंकाळी आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. महिला शाहीर सीमा पाटील, नागसेन सवदेकर, डॉ. मधुकर मेश्राम यांच्या कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून दाद दिली.

 

याचबरोबर आज 12 एप्रिल रोजी सायंकाळी डॉ. गणेश चंदनशिवे, गौरव जाधव, चंद्रकांत प्रल्हाद शिंदे, कुणाल वराळे, शाहीर संतोष साळुंखे यांनी आपल्या बहारदार सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. गुरूवार दिनांक 13 एप्रिल रोजी मीरा उमप, अभिजीत कोसंबी, प्रसेनजीत कोसंबी व सहकलाकारांचा तक्षशिला बुद्ध विहार मैदानावर बहारदार कार्यक्रम सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमास नांदेडच्या रसिकांनी भरभरून दाद द्यावी, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

00000



 समता पर्व अभियाना अंतर्गत

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती 11 एप्रिल रोजी साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्त पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच त्यांनी शाळेच्या विद्यार्थी –विद्यार्थीनीना व नागरीकांना जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.

सकाळी 9 वा. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. या रॅलीला सहाय्यक आयुक्त डॉ.तेजस माळवदकर यांनी हिरवी झेंडी दाखवली. ही रॅली छत्रपती राजर्षी शाहू महाराज पुतळा ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळयापर्यंत काढण्यात आली. या रॅलीमध्ये इंग्रजी माध्यमाच्या नामांकीत निवासी शाळा, इंदिरा इंटरनॅशनल  पब्लिक  स्कुल विष्णुपरी, शांती निकेतन पब्लीक स्कुल मालेगांव, शंकरराव चव्हाण इंटरनॅशनल पब्लिक स्कुल दत्तनगर, जिनिअस पब्लीक स्कुल आनंदनगर, गुरुकुल पब्लिक स्कुल वाडी बु. व पोदार इंटरनॅशनल स्कुल, नारायणा इंटरनॅशनल स्कूल, केंब्रिज स्कुल शिवाजीनगर इत्यादी शाळेतील विद्यार्थ्यानी रॅलीत सहभाग घेतला. शासकीय वसतिगृहातील मुले-मुली, कर्मचारी यांनी रॅलीत सहभाग नोंदविला.

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत 1 एप्रिल ते 1 मे 2023 या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता पर्व अभियान राबविण्यात येत आहे. समता पर्वानिमित्त क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती 11 एप्रिल रोजी समाज कार्यालयाच्यावतीने मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच विद्यार्थी-विद्यार्थीनीना शुभेच्छा दिल्या. सामाजिक समता पर्वा निमित्त समाज कल्याण कार्यालय अधिनस्त अनु.जाती मुला-मुलींची शासकीय निवासी शाळा एकूण 4 व मुला-मुलींचे 16 शासकीय वसतिगृहात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जीवनचरित्रावर आधारीत वाचन प्रेरणा उपक्रम राबविण्यात आला. यात शासकीय निवासी शाळेतील व शासकीय वसतीगृहातील जवळपास 1500 ते 1700 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सुत्र संचलन समाज कल्याण अधिकारी बापु दासरी यांनी केले .

0000

 केंद्रीय राज्यमंत्री कपिल मोरश्वर पाटील यांचा नांदेड दौरा

नांदेड (जिमाका) दि. 12 :- केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल मोरश्वर पाटील हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. 

गुरुवार 13 एप्रिल रोजी राज्यराणी एक्सप्रेसने सकाळी 7.25 वा. नांदेड येथे आगमन व शासकीय विश्रामगृह नांदेडकडे वाहनाने प्रयाण. सकाळी 7.35 ते 9.30 वाजेपर्यत शासकीय विश्रामगृह येथे राखीव. सकाळी 9.30 वा. शासकीय विश्रामगृह येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. सकाळी 9.40 वा. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आगमन. सकाळी 9.45 ते 11.45 या कालावधीत नियोजन भवन येथील चौथ्या रोजगार मेळाव्यास प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थिती. सकाळी 11.45 वा. शासकीय विश्रामगृह कडे प्रयाण. सकाळी 11.55 ते सायं. 6 वाजेपर्यत स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती व राखीव. सायं 6.50 वा. देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.

0000

 जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस व वादळी वारे वाहण्याची शक्यता

नागरिकांनी सावधगिरी बाळगावी 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार 14  व 15  एप्रिल 2023 या दोन दिवसासाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. 14 व 15 एप्रिल रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगाच्या गडगडाटासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी असे, आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे.

 0000 

Tuesday, April 11, 2023

राष्ट्रीय युवा स्वयंसेवक पदासाठी

अर्ज करण्यास 3 मे पर्यत मुदतवाढ

नांदेड (जिमाका) दि. 11 :- राष्ट्र उभारणीच्या कार्यात युवकांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करणे, स्वच्छता अभियान, आरोग्य जागृती, साक्षरता, लिंग, भेद, सामाजिक समस्याचे निराकरण करण्यासाठी नेहरू युवा केंद्र नांदेड यांच्यावतीने राष्ट्रीय युवा कोर राष्ट्रीय स्वयंसेवक पदाकरिता अर्ज मागविण्यात आले होते. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आता 3 मेपर्यत मुदतवाढ दिली असून उमेदवारांनी या https://nyks.nic.in/nycapp/main.asp  संकेतस्थळावर अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी नेहरू युवा केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन नेहरु युवा केंद्राच्या जिल्हा युवा अधिकारी चंद्रकला रावळकर यांनी केले आहे.

राष्ट्रीय युवा कोर राष्ट्रीय स्वयंसेवक पदासाठी उमेदवाराचे वय 1 एप्रिल 2023 रोजी 18 वर्षापेक्षा जास्त व 29 वर्षाच्या आत असावे. उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी 10 वी पास असावे. पदवीधर व समाजकार्य पदवीधरांस प्राधान्य दिले जाईल. स्वयंसेवकासाठी नियमित शिक्षण घेत असलेले विद्यार्थी यासाठी पात्र राहणार नाहीत. मासिक एकत्रित मानधन रुपये 5 हजार रुपये असून यामध्ये प्रवास भत्ता समाविष्ट आहे. ही नोकरी नसल्यामुळे स्वयंसेवकास कोणताही क्लेम मिळणार नाही. कोणत्याही प्रकारचा रोजगारांसाठी अधिकार राहणार नाही. प्रत्येक तालुक्यासाठी 2 स्वयंसेवक असतील. कालावधी एक वर्षाकरीता असून कामाचे स्वरूप लक्षात घेता पुढील वर्षासाठी मुदतवाढ देण्यात येईल. नेहरू युवा केंद्र संगठनच्या वेबसाईटवर योजनेची सविस्तर माहिती आहे.  उमेदवार हा नांदेड जिल्हयातील रहिवासी असावा. उमेदवार ज्या तालुक्यातीत आहे त्या तालुक्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. कार्यालय पत्ता- नेहरू युवा केन्द्र नांदेड, मालेगाव रोड, शिवराय नगर, तरोडा नांदेड मो.क्र. ८९९९२८३७२६ याप्रमाणे आहे.

0000

 

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...