वृत्त क्रमांक
दुष्काळात पशुधनाच्या चारा-पाणी व्यवस्थापनासाठी शास्त्रीय नियोजन करा
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन
• कारेगाव येथे शेतकरी व पशुपालकांशी संवाद
नांदेड, दि. 1 : दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा व पाण्याचे योग्य नियोजन करून उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करावा. पशुधनाचे आरोग्य व उत्पादनक्षमता टिकविण्यासाठी शास्त्रीय चारा व्यवस्थापनावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
लोहा तालुक्यातील कारेगाव येथे शनिवारी, दि. 31 ऑक्टोबर रोजी प्रगतशील शेतकरी सुधाकर किरवले पाटील यांच्या प्रक्षेत्रावर चारा साक्षरता अभियानांतर्गत शेतकरी व पशुपालकांसाठी मार्गदर्शन व संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी हिरवा व वाळलेला चारा, सोयाबीन कुटार, पिकांचे अवशेष यांचा योग्य वापर, मुरघास निर्मिती, चारा साठवणूक, संतुलित पशुआहार आणि पाणी व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रशासन शेतकरी व पशुपालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, भविष्यातील चारा व पाणीटंचाई टाळण्यासाठी जलसंवर्धन आणि नैसर्गिक संसाधनांचे जतन करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी कर्डिले यांनी सांगितले.
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे सेवानिवृत्त विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने यांनी पशुधनाचे आरोग्य व उत्पादनक्षमता टिकविण्यासाठी संतुलित आहार आणि चारा व्यवस्थापनाचे महत्त्व विशद केले. प्रादेशिक सहआयुक्त डॉ. राजकुमार पडिले व जिल्हा उपआयुक्त डॉ. सखाराम खुणे यांनी पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना व उपाययोजनांची माहिती दिली.
यावेळी जिल्हाधिकारी व मान्यवरांनी सुधाकर किरवले पाटील यांच्या प्रक्षेत्रावरील पशुधन, चारा साठा आणि मुरघासाची पाहणी केली. कार्यक्रमास कंधारचे उपविभागीय अधिकारी विलास नरुटे, लोहा नगराध्यक्ष शरद पवार, तहसीलदार विठ्ठल परळीकर, सहाय्यक आयुक्त डॉ. प्रविणकुमार घुले, कृषी विज्ञान केंद्र, पोखर्णीचे डॉ. महेश अंभोरे यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी व पशुपालक उपस्थित होते.
***




.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment