Sunday, November 1, 2026

विशेष वृत्त क्रमांक

सोनखेडच्या गोरगरीब रुग्णांना स्थानिक पातळीवरच दर्जेदार उपचार द्या!

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे प्राथमिक आरोग्य केंद्राला भेटीदरम्यान निर्देश

प्रसूती सुविधा सक्षम करा; औषधसाठा आणि रुग्णवाहिका सेवांबाबत दक्ष राहण्याच्या सूचना

नांदेड, दि. १ : सोनखेड (ता. लोहा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांना स्थानिक पातळीवरच वेळेवर, सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात. किरकोळ तसेच उपचारयोग्य आजारांसाठी रुग्णांना अन्यत्र पाठविण्याचे प्रमाण कमी करावे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. आरोग्य संवाद यात्रेदरम्यान त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन उपलब्ध आरोग्य सुविधा, प्रसूती सेवा आणि नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली.

प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिकाधिक प्रसूती होण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. गर्भवती मातांना आवश्यक तपासण्या, समुपदेशन आणि उपचार वेळेत उपलब्ध करून द्यावेत. तसेच डीटी, टीटी आणि रेबीज प्रतिबंधक लसींसह सर्व जीवनावश्यक औषधांचा पुरेसा साठा कायम उपलब्ध ठेवावा. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने वैद्यकीय मदत मिळण्यासाठी १०२ व १०८ रुग्णवाहिका सेवांची माहिती गावागावांत पोहोचवून जनजागृती करावी, अशा सूचनाही आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.

यावेळी आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीच्या सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी करून कामाच्या प्रगतीचा व गुणवत्तेचा आढावा घेतला. बांधकामाचा दर्जा उत्तम राखावा तसेच आवश्यक त्या दुरुस्त्या व सुधारणा वेळेत पूर्ण कराव्यात, असे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले. नागरिकांशी थेट संवाद साधून आरोग्यविषयक समस्या जाणून घेतल्या. 

आरोग्य संवाद यात्रेदरम्यान आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोनखेड येथील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. स्थानिक आरोग्य सुविधांबाबतच्या त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि आरोग्यविषयक समस्या जाणून घेतल्या. नागरिकांना आरोग्य सेवा मिळविताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने अधिक संवेदनशीलतेने व जबाबदारीने काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शासनाच्या आरोग्य सेवा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे, गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी दिलासा देणे आणि प्रत्येक नागरिकाला गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे आरोग्य विभागाचे प्राधान्य असले पाहिजे, असेही आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

आरोग्य संवाद यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या आरोग्य सेवा थेट जनतेपर्यंत पोहोचविण्यासोबतच स्थानिक पातळीवरील समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यावर भर देण्यात येत आहे.

यावेळी आमदार आनंद तिडके-बोंढारकर, संचालक शहरी आरोग्य सेवा डॉ.गोविंद चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, क्षयरोग अधिकारी

 डॉ. मिरदुडे  व इतर जिल्हास्तरीय अधिकारी हजर होते. तसेच तालुका आरोग्य अधिकारी,  वैद्यकीय अधिकारी, इन्चार्ज  सिस्टर, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यक यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

***










No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक दुष्काळी परिस्थितीत मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार हमीच्या कामांना गती प्रत्येक ग्रामपंचायतीत दर १५ दिवसांनी रोजगार मा...