Sunday, November 1, 2026

वृत्त क्रमांक

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर उद्या नांदेडमधील आरोग्य समित्या व नागरिकांशी साधणार थेट संवाद

• ‘आरोग्य संवाद यात्रा 2026’ अंतर्गत दूरदृश्यप्रणाली व दूरध्वनीद्वारे संवाद

• आरोग्य सेवांच्या सक्षमीकरणासाठी लोकसहभागावर भर

नांदेड, दि. 01 : राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘आरोग्य संवाद यात्रा 2026’ अंतर्गत राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर हे उद्या, सोमवार, दि. 2 नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील विविध आरोग्य समित्यांचे पदाधिकारी, सदस्य, अधिकारी, खासगी वैद्यकीय व्यावसायिक आणि नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत. दूरदृश्यप्रणाली आणि दूरध्वनीच्या माध्यमातून हा संवाद होणार आहे.

राज्यभरात दि. 01 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2026 या कालावधीत ‘आरोग्य संवाद यात्रा 2026’ राबविण्यात येत आहे. ‘लोकसहभागातून घडवूया माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ ही या उपक्रमाची संकल्पना आहे. आरोग्य सेवांमधील लोकसहभाग वाढविणे, आरोग्य समित्यांचे सक्षमीकरण करणे आणि स्थानिक पातळीवरील आरोग्यविषयक समस्या जाणून घेऊन त्यावर प्रभावी उपाययोजना करणे, हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे.

खासगी डॉक्टरांशी सकाळी 9 वाजता संवाद

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर हे सकाळी 9 वाजता नांदेड शहरातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांशी आरोग्यविषयक विविध महत्त्वाच्या बाबींवर संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम कै. डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन, नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे.

सकाळी 10 वाजता आरोग्य समित्यांशी थेट संवाद

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहातून सकाळी 10 वाजता दूरदृश्यप्रणाली व दूरध्वनीद्वारे जिल्ह्यातील विविध आरोग्य समित्यांचे पदाधिकारी, सदस्य आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे.

या संवादामध्ये जिल्हा व तालुकास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समित्या, रुग्ण कल्याण समित्या, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रस्तरीय जन आरोग्य समित्या, ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समित्या तसेच शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कार्यरत महिला आरोग्य समित्यांचा सहभाग अपेक्षित आहे.

आरोग्य सेवांच्या सुधारणेसाठी लोकसहभाग महत्त्वाचा

या उपक्रमातून आरोग्य समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेणे, स्थानिक आरोग्यविषयक अडचणी जाणून घेणे, आरोग्य सेवांचा दर्जा सुधारणे आणि शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे यावर भर देण्यात येणार आहे. गावपातळीपासून जिल्हास्तरापर्यंत आरोग्यविषयक प्रश्नांवर थेट संवाद साधून नागरिकांचा आरोग्य व्यवस्थेतील सहभाग अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न या यात्रेच्या माध्यमातून केला जाणार आहे.

या विशेष संवाद उपक्रमात नांदेड जिल्ह्यातील सर्व आरोग्य समित्यांचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य, संबंधित अधिकारी, खासगी वैद्यकीय व्यावसायिक तसेच नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषद, नांदेडच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

***

No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्रमांक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे हिमायतनगर तालुक्यात आरोग्य सुविधांच्या सक्षमीकरणासाठी निर्देश ‘आरोग्य संवाद यात्रा 2026...