Sunday, November 1, 2026

वृत्त क्रमांक

‘एक देश, एक निवडणूक’ विषयावर युवकांची अभ्यासपूर्ण मते; विकसित भारत युवा संसद उत्साहात

• माय भारततर्फे जिल्हास्तरीय युवा संसदेचे आयोजन

• 50 हून अधिक युवक-युवतींचा सहभाग

नांदेड, दि. 01 : युवकांमध्ये नेतृत्वगुण, लोकशाही मूल्यांची जाणीव आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांवरील चिकित्सक विचारशक्ती विकसित करण्याच्या उद्देशाने माय भारत, नांदेड यांच्या वतीने यशवंत महाविद्यालयात जिल्हास्तरीय ‘विकसित भारत युवा संसद 2026-27’ उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत जिल्ह्यातील 50 हून अधिक युवक-युवतींनी सहभाग नोंदवत ‘एक देश, एक निवडणूक’ या विषयावर आपली मते प्रभावीपणे मांडली.

कार्यक्रमाचे उद्घाटन यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे यांच्या हस्ते झाले. युवकांनी राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांचा सखोल अभ्यास करून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

या स्पर्धेत सहभागी युवकांनी ‘एक देश, एक निवडणूक’ संकल्पनेचे फायदे, आव्हाने तसेच भारतीय लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थेवरील संभाव्य परिणाम यांवर अभ्यासपूर्ण मते मांडली. परीक्षक म्हणून प्रा. डॉ. शिवाजी सूर्यवंशी, विष्णू गोदबोले, सारिका बकवाड पाटील, प्रा. रितीशा नालवडे आणि नागसेन तुळसे यांनी काम पाहिले.

या स्पर्धेत कु. मेहक पठाण यांनी प्रथम, अभिजित कोलते यांनी द्वितीय, तर कु. अनीशा डोडके यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

यावेळी माय भारतच्या जिल्हा युवा अधिकारी कु. अशनी अनिल कानकटे यांनी युवकांनी संवादकौशल्य, नेतृत्वक्षमता, चिकित्सक विचारशक्ती आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित करून उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. युवा संसदेसारखे उपक्रम युवकांमध्ये आत्मविश्वास, लोकशाही मूल्ये आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख डॉ. सायननाथ बिंदगे, इंग्रजी विभागाच्या प्राध्यापिका डॉ. रत्नमाला म्हस्के यांच्यासह प्राध्यापक, परीक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी जिल्हा युवा अधिकारी कु. अशनी कानकटे यांनी आभार मानले.

‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’ या केंद्र शासनाच्या उपक्रमाचा भाग असलेल्या युवा संसदेच्या माध्यमातून युवकांना विकसित भारत @2047 या संकल्पनेशी जोडणे, राष्ट्रीय विषयांवर विचारमंथन घडविणे आणि देशाच्या विकासप्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.

**



No comments:

Post a Comment

विशेष वृत्त क्रमांक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे हिमायतनगर तालुक्यात आरोग्य सुविधांच्या सक्षमीकरणासाठी निर्देश ‘आरोग्य संवाद यात्रा 2026...