वृत्त क्रमांक
प्रलंबित महसुली दाव्यांचा तडजोडीतून कायमस्वरूपी निपटारा करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात 5 नोव्हेंबरला महसूल लोक अदालत
- तालुका व मंडळ स्तरावर विशेष लोक अदालतीचे आयोजन
- नागरिकांनी अभियानाचा लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
नांदेड, दि. 02 : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती
वर्षाचे औचित्य साधून राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार
राज्यात 01 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत ‘महात्मा ज्योतिराव फुले
महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यात
गुरुवार, दि. 5 नोव्हेंबर 2026 रोजी तालुका व मंडळ स्तरावर विशेष महसूल लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले
आहे.
महसूल प्रशासनातील मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी
(भूसंपादन) तसेच अपर जिल्हाधिकारी यांच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये जमिनीशी
संबंधित विविध महसुली दावे व अपिले प्रलंबित असतात. ही प्रकरणे अनेक वर्षे
प्रलंबित राहिल्याने संबंधित पक्षकारांचा वेळ व पैसा खर्च होतो. या पार्श्वभूमीवर
परस्पर संमतीने व तडजोडीच्या माध्यमातून प्रकरणांचा जलद निपटारा करणे, पक्षकारांची वेळ व पैशांची बचत करणे आणि महसूल यंत्रणेवरील प्रलंबित
प्रकरणांचा ताण कमी करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
या लोक अदालतीमध्ये मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, उपविभागीय
अधिकारी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) व अपर जिल्हाधिकारी
यांच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या विविध प्रकारच्या महसुली
दाव्यांचा व अपिलांचा समावेश असेल. संबंधित पक्षकारांनी परस्पर संमतीने किंवा
आपल्या वकिलामार्फत विहित ‘प्रपत्र-अ’ मधील तडजोडनामा अर्ज संबंधित न्यायालयात
सादर करावा. प्राप्त अर्जांची छाननी करून दोन्ही पक्षकारांच्या संमतीची खात्री
करण्यात येईल. त्यानंतर कायदेशीर तडजोडनामा तयार करून लोक अदालतीमध्ये दोन्ही
पक्षांच्या सहमतीने अंतिम आदेश पारित करण्यात येतील.
नांदेड जिल्ह्यातील सर्व संबंधित
पक्षकारांनी आपल्या प्रलंबित महसुली दाव्यांचा तडजोडीने जलद व कायमस्वरूपी निपटारा
करून घेण्यासाठी 5 नोव्हेंबर रोजी आयोजित महसूल लोक
अदालतीमध्ये सहभागी व्हावे आणि या अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
********

No comments:
Post a Comment