वृत्त क्रमांक
निवृत्तीवेतनधारकांनी घरबसल्या सादर करावे डिजिटल जीवन प्रमाणपत्र
- 1 ते 30 नोव्हेंबरदरम्यान राष्ट्रव्यापी मोहीम;
बँक किंवा कोषागार कार्यालयात जाण्याची गरज नाही
नांदेड, दि. 02 : केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण
विभागामार्फत 1 ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत पाचवी राष्ट्रव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम
राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत राज्य शासनाच्या निवृत्तीवेतनधारक आणि
कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी ‘जीवन प्रमाण’ या प्रणालीद्वारे घरबसल्या डिजिटल जीवन
प्रमाणपत्र सादर करावे, असे आवाहन नांदेडच्या जिल्हा कोषागार
अधिकारी शोभा मुंडे आणि अपर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन) नामदेव राठोड यांनी
केले आहे.
राज्य शासनाच्या निवृत्तीवेतनधारकांना
निवृत्तीवेतनाचे नियमित प्रदान सुरू राहण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात
हयातीचा दाखला सादर करणे आवश्यक असते. ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोयीस्कर
करण्यासाठी केंद्र शासनाने ‘जीवन प्रमाण’ ही डिजिटल प्रणाली विकसित केली आहे. या
प्रणालीच्या माध्यमातून निवृत्तीवेतनधारकांना डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर
करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी
निवृत्तीवेतनधारकांना बँक किंवा कोषागार कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची
आवश्यकता नाही. आधार आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरण किंवा चेहरा प्रमाणीकरणाच्या
(फेस ऑथेंटिकेशन) माध्यमातून मोबाईलवर डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करून सादर करता
येते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या ही प्रक्रिया पूर्ण करणे शक्य होणार
आहे.
डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करण्याची
प्रक्रिया आणि त्यासाठी आवश्यक असलेली माहिती सर्व बँकांच्या शाखा अधिकाऱ्यांना
देण्यात आली आहे. तसेच या प्रक्रियेविषयीची सविस्तर माहिती विविध
प्रसारमाध्यमांद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सर्व निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी 1 ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत ‘जीवन प्रमाण’ प्रणालीचा वापर करून डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करावे आणि या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी शोभा मुंडे आणि अपर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन) नामदेव राठोड यांनी केले आहे.
********
No comments:
Post a Comment