वृत्त क्रमांक
आरोग्य सेवेत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही; दोषींवर तातडीने कारवाई करा – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
- आरोग्य समित्यांच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे
संवाद
- आठ दिवसांत कामकाजात सुधारणा दिसण्याचे निर्देश
नांदेड, दि. 02 : सर्वसामान्य नागरिकांना शासकीय आरोग्य
संस्थांमध्ये दर्जेदार, वेळेत आणि आवश्यक आरोग्यसेवा मिळणे
ही यंत्रणेची जबाबदारी आहे. आरोग्य संस्थांमधील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची
अनुपस्थिती, औषधांचा तुटवडा आणि सुविधांमधील त्रुटी याबाबत
प्राप्त होणाऱ्या तक्रारींची गांभीर्याने दखल घ्यावी. गैरहजर राहणाऱ्या
अधिकारी-कर्मचाऱ्यांची चौकशी करून नियमानुसार कारवाई करावी. कोणाचीही गय न करता
आरोग्य सेवेत सुधारणा घडवून आणाव्यात, असे स्पष्ट निर्देश
राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
पुढील आठ दिवसांत कामकाजात सुधारणा दिसून यावी, असे
निर्देशही त्यांनी दिले.
‘आरोग्य जनसंवाद यात्रा 2026’च्या अनुषंगाने आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नांदेड जिल्ह्यातील
सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत विविध आरोग्य समित्यांचे पदाधिकारी व
अधिकारी यांच्याशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालयातील
नियोजन समितीच्या सभागृहातून हा संवाद साधण्यात आला. यावेळी आरोग्य संस्थांमधील
उपलब्ध सुविधा, औषधे व लसींचा पुरवठा, वैद्यकीय
अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती, आरोग्य समित्यांच्या
नियमित बैठका आणि नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्यसेवेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा
आमदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार बाबूराव कदम कोहळीकर, आमदार आनंद
तिडके-बोंढारकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, आरोग्य सेवेचे
संचालक (शहरी) डॉ. गोविंद चौधरी, संचालक (प्राथमिक) डॉ. विजय
कंदेवाड, आरोग्य उपसंचालक डॉ. सतीशकुमार सोळंके, जिल्हा
शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय नवले उपस्थित
होते.
दूरदृश्यप्रणालीद्वारे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार राजेश पवार, आमदार श्रीजया चव्हाण, आमदार जितेश अंतापूरकर यांच्यासह विविध आरोग्य समित्यांचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
आरोग्य समित्यांनी नियमित आढावा घेऊन जबाबदारी पार पाडावी
मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालय, सोनखेड व रहाटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच देगलूर व पिंपळगाव
येथील आरोग्य उपकेंद्रांच्या कामकाजाचा यावेळी आढावा घेण्यात आला. संबंधित आरोग्य
समित्यांच्या नियमित बैठका होतात का, रुग्णालयांना आवश्यक
औषधे व लसींचा पुरवठा होतो का, रुग्णांसाठी आवश्यक सुविधा
उपलब्ध आहेत का, याबाबत आरोग्यमंत्र्यांनी माहिती घेतली.
आरोग्य समित्यांच्या दर तीन महिन्यांनी नियमित बैठका होणे अपेक्षित आहे. नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठीच या समित्यांची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे समित्यांवरील पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत का, डॉक्टर व कर्मचारी नियमित उपस्थित राहतात का, रुग्णांच्या आवश्यक तपासण्या वेळेत होतात का, याची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घ्यावा. आरोग्य संस्थांच्या कामकाजावर सातत्याने लक्ष ठेवून त्रुटी दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे निर्देश आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी दिले.
गैरहजर अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई; तक्रार निवारणासाठी पोर्टल
आरोग्य संस्थांमधील वैद्यकीय अधिकारी व
कर्मचाऱ्यांच्या अनियमित उपस्थितीबाबत लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या तक्रारींची
आरोग्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली. गैरहजर राहणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी
करून त्याबाबतचा अहवाल तातडीने सादर करावा. आरोग्य सेवेत निष्काळजीपणा करणाऱ्या
अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, असे
त्यांनी सांगितले.
आरोग्य सेवांशी संबंधित तक्रारी
नागरिकांना नोंदविता याव्यात, यासाठी स्वतंत्र पोर्टल
विकसित करण्यात येणार आहे. आरोग्य संस्थांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध होत नसल्यास
किंवा सेवा मिळण्यात अडचणी येत असल्यास नागरिकांना या पोर्टलच्या माध्यमातून
तक्रार नोंदविता येईल. प्राप्त तक्रारींची दखल घेऊन त्यांचे निराकरण करण्याची व्यवस्था
निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
मुखेड उपजिल्हा रुग्णालय आणि कंधार उपजिल्हा रुग्णालयाबाबत प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने आरोग्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आरोग्य संस्थांतील सुविधांबाबत लोकप्रतिनिधींच्या सूचना
या संवादादरम्यान माजी मुख्यमंत्री तथा
खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे आणि आमदार
प्रताप पाटील चिखलीकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार राजेश पवार, आमदार श्रीजया चव्हाण व आमदार
जितेश अंतापूरकर यांनी विविध आरोग्य संस्थांमधील अडचणी आणि आवश्यक सुधारणांबाबत
सूचना मांडल्या.
आरोग्य संस्थांमध्ये वैद्यकीय अधिकारी व
कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, कामावर उशिरा येणे, औषधे व प्रतिबंधात्मक लसींचा पुरवठा, मनुष्यबळाची
कमतरता, उपजिल्हा रुग्णालयांसाठी आवश्यक निधी, आधुनिक वैद्यकीय सुविधा, स्वच्छता आणि वैद्यकीय
कचऱ्याची योग्य विल्हेवाट या विषयांकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष वेधले. कर्मचाऱ्यांची
उपस्थिती नियमित राहावी यासाठी बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली प्रभावीपणे लागू
करण्याची, रिक्त पदे भरण्याची आणि आरोग्य संस्थांमधील
पायाभूत सुविधा बळकट करण्याची मागणीही करण्यात आली.
या सूचनांची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी प्रभावी अंमलबजावणी करावी. आरोग्य संस्थांमधील त्रुटी दूर करून नागरिकांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून द्याव्यात. तक्रारींच्या अनुषंगाने दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, असे निर्देश आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी दिले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन कामकाज तपासावे
आरोग्य यंत्रणेतील उपलब्ध मनुष्यबळ, साधनसामग्री आणि सुविधांचा प्रभावी वापर करून नागरिकांना चांगली सेवा देता
येणे आवश्यक आहे. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयीन आढावा न घेता
प्रत्यक्ष आरोग्य केंद्रांना भेटी द्याव्यात. तेथील कामकाजाची पाहणी करून वैद्यकीय
अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती, औषधसाठा, तपासणी सुविधा आणि रुग्णांना मिळणाऱ्या सेवांची पडताळणी करावी.
शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ पात्र व गरजू नागरिकांपर्यंत पोहोचतो की नाही, याचे नियमित संनियंत्रण करावे. आरोग्य सेवांमधील त्रुटी दूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
आरोग्य जनसंवाद यात्रेतून तक्रारींचे तातडीने निराकरण
आरोग्य जनसंवाद यात्रेदरम्यान विविध
आरोग्य संस्थांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे. रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून डॉक्टरांची
अनुपलब्धता, औषधांचा तुटवडा, तपासण्यांमधील
अडचणी, स्वच्छता, संदर्भ सेवा आणि
रुग्णांचा प्रतीक्षा कालावधी यांसारख्या समस्यांची माहिती घेतली जाणार आहे.
प्रत्येक तक्रारीसाठी संबंधित जबाबदार
अधिकारी निश्चित करून आवश्यक कार्यवाही केली जाईल. गंभीर आणि तातडीच्या
स्वरूपाच्या समस्यांचे प्राधान्याने निराकरण करण्यात येणार आहे. या यात्रेच्या
माध्यमातून आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी दूर करून सर्वसामान्य नागरिकांना अधिक सक्षम, सुलभ आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार
असल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
********
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment