वृत्त क्रमांक
गुरुवार पासून करता येणार घरबसल्या खतांची खरेदी
केंद्र सरकारच्या फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल अॅपमुळे खत खरेदीचा मार्ग सुकर
• खत खरेदीची डिजिटल सुविधा
• ‘एफएफएफएस’ अॅपद्वारे घरबसल्या खतांचा साठा व उपलब्धतेची माहिती; शेतकऱ्यांच्या रांगा आणि जादा दराने विक्रीला आळा
नांदेड (जिमाका), दि. 19 : शेतकऱ्यांना खत खरेदी सुलभ व्हावी, तसेच खतांची उपलब्धता, साठा आणि विक्री प्रक्रियेत पारदर्शकता यावी, यासाठी केंद्र सरकारने फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल (एफएफएफएस) ही डिजिटल प्रणाली विकसित केली आहे. महाराष्ट्रात गुरुवार, दि. 22 ऑक्टोबरपासून या प्रणालीची अंमलबजावणी करण्यात येणार असून, शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे आपल्या परिसरातील खतांची उपलब्धता आणि साठ्याची माहिती मिळविणे शक्य होणार आहे. त्यामुळे खत खरेदीसाठी दुकानांसमोर रांगा लावण्याची गरज कमी होणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी द. रा. कळसाईत यांनी दिली.
मोबाईलवर मिळणार खतांच्या उपलब्धतेची माहिती
शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलमधील प्ले स्टोअरवरून हे अॅप डाउनलोड करून वापरता येणार आहे. या अॅपद्वारे परिसरातील कोणत्या कृषी सेवा केंद्रात कोणते खत उपलब्ध आहे आणि त्याचा किती साठा आहे, याची माहिती मिळेल. खत खरेदीची प्रक्रिया डिजिटल पद्धतीने सुलभ करण्यास या प्रणालीमुळे मदत होणार आहे. तसेच प्रणालीतील नोंदीनुसार खत खरेदीसाठी आरक्षित केलेले खत संबंधित दुकानदाराने उपलब्ध करून देणे बंधनकारक राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जादा दराने विक्री आणि खतांसोबत इतर निविष्ठांची सक्ती रोखण्यास मदत
या डिजिटल प्रणालीमुळे खत विक्री प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. खतांची छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणे तसेच अनुदानित खतांसोबत इतर कृषी निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करणे, अशा प्रकारांना आळा घालण्यास मदत होणार आहे. खत विक्रीतील पारदर्शकता वाढविणे आणि शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दूर करणे हा या प्रणालीचा प्रमुख उद्देश आहे. यापूर्वी नाशिक जिल्ह्यात या प्रणालीची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्यात आली होती. आता संपूर्ण राज्यात ही प्रणाली लागू करण्यात येणार आहे.
गावपातळीवर प्रशिक्षण; तक्रारींच्या निवारणासाठी तालुकास्तरीय कक्ष
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या अॅपचा वापर करता यावा, यासाठी क्षेत्रीय सहाय्यक कृषी अधिकारी आणि संबंधित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत गावपातळीवर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच शेतकरी आणि कृषी सेवा केंद्र चालकांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी तालुकास्तरावर व्यवस्था करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी खत खरेदीसंदर्भात काही अडचण किंवा तक्रार असल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील गुणवत्ता नियंत्रण विभागाचे कृषी अधिकारी तसेच पंचायत समितीतील कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी द. रा. कळसाईत यांनी केले आहे.
***
No comments:
Post a Comment