Monday, October 19, 2026

 वृत्त क्रमांक

मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र परिसरातील आठवडी बाजार बंद

• 23 ऑक्टोबरचे आठवडी बाजार 24 ऑक्टोबर रोजी भरविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

नांदेड (जिमाका), दि. 19 : महाराष्ट्र विधान परिषद 05 औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यांमध्ये शहरी व ग्रामीण भागातील एकूण 120 मतदान केंद्रांवर शुक्रवार, दि. 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मतदान केंद्र परिसरातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत.

महाराष्ट्र राज्याचे पणन संचालक, पुणे यांनी दिलेल्या निर्देशानुसार मतदानाच्या दिवशी नांदेड जिल्ह्यातील संबंधित 120 मतदान केंद्र परिसरात भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच हे आठवडी बाजार अन्य दिवशी भरविण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

23 ऑक्टोबरचे बाजार 24 ऑक्टोबरला भरविण्याचे निर्देश

मार्केट अँड फेअर अॅक्ट, 1862 मधील कलम 5 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यांतील शहरी व ग्रामीण भागातील 120 मतदान केंद्रांच्या परिसरात दि. 23 ऑक्टोबर रोजी भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मतदानाच्या दिवशी बंद ठेवण्यात येणारे हे सर्व आठवडी बाजार शनिवार, दि. 24 ऑक्टोबर 2026 रोजी भरविण्यात यावेत, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

मतदान केंद्र परिसरात मतदानाची प्रक्रिया सुरळीत, सुरक्षित व निर्विघ्नपणे पार पडावी, तसेच मतदान केंद्र परिसरात अनावश्यक गर्दी होऊ नये, यासाठी संबंधितांनी या आदेशाची अंमलबजावणी करावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

***

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक तात्पुरत्या फटाका परवान्यांसाठी अर्ज स्वीकारण्यास 27 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ नांदेड महानगरपालिका हद्दीसह जिल्ह्यातील संबंधि...