वृत्त क्रमांक
पदवीधर मतदान केंद्रांच्या 200 मीटर परिसरात निर्बंध-जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आदेश
नांदेड(जिमाका), दि. 19: 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2026 अंतर्गत दि. 23 ऑक्टोबर 2026 रोजी होणाऱ्या मतदानाची प्रक्रिया शांततेत, निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 मधील कलम 163 अन्वये मतदान केंद्रांच्या 200 मीटर परिसरात विविध निर्बंध लागू केले आहेत.
भारत निवडणूक आयोगाने दि. 22 सप्टेंबर 2026 रोजी 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची घोषणा केली असून, त्याच दिवसापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात विविध बाबींवर प्रतिबंध
दि. 23 ऑक्टोबर रोजी मतदान सुरू झाल्यापासून मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मतदान केंद्रापासून 200 मीटर परिसरात राजकीय पक्षांचे मंडप, दुकाने, फेरीवाले तसेच निवडणूक कामाव्यतिरिक्त खासगी वाहनांना प्रतिबंध राहील. संबंधित पक्षांच्या चिन्हांचे प्रदर्शन करण्यासही मनाई करण्यात आली आहे.
तसेच मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस संच, ध्वनिक्षेपक आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करण्यास प्रतिबंध राहणार आहे. निवडणूक कामाव्यतिरिक्त व्यक्तींना या परिसरात प्रवेश करता येणार नाही.
मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आदेश लागू
निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखणे आवश्यक असल्याने सद्यस्थितीत सर्व संबंधितांना स्वतंत्र नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेणे शक्य नसल्याचे नमूद करून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 मधील कलम 163(2) अन्वये हा एकतर्फी आदेश जारी करण्यात आला आहे.
हा आदेश नांदेड जिल्ह्याच्या हद्दीत दि. 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान सुरू झाल्यापासून मतदान प्रक्रिया संपेपर्यंत लागू राहणार आहे.
***
No comments:
Post a Comment