Friday, October 9, 2026

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त 

करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता ! 

दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून दुसऱ्या दिवशी चार पर्यंत अखंड दौरा 

शेताच्या बांधापर्यंत ; तीन जिल्ह्यांत पीक नुकसानीची पाहणी, शेतकरी व महिला शेतमजुरांशी संवेदनशील संवाद ! 

छत्रपती संभाजीनगर, दि. ९ : शेतात पेरलेले बी हे केवळ पीक नसते; त्यात शेतकऱ्याच्या वर्षभराच्या कष्टांची, कुटुंबाच्या अपेक्षांची आणि उद्याच्या जगण्याची स्वप्ने असतात. मात्र, पावसाने दीर्घकाळ पाठ फिरवली की पिकांसोबत ही स्वप्नेही कोमेजून जातात. करपलेली पिके, आटलेल्या विहिरी, कोरडी नदीपात्रे आणि पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी धावपळ… मराठवाड्यातील दुष्काळाची हीच दाहकता केंद्रीय आंतरमंत्रालयीन पथकाने प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन अनुभवली. केवळ आकडेवारी आणि अहवालांपुरते दुष्काळाचे आकलन मर्यादित न ठेवता शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न या दौऱ्यात करण्यात आला.

गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता विभागीय आयुक्तालयात सुरू झालेला आढावा आणि त्यानंतरचा प्रत्यक्ष पाहणी दौरा शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजेपर्यंत सुरू होता. विभागीय आयुक्तालयातील सविस्तर सादरीकरणानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करून पथकाने पीक नुकसान, पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांच्या अडचणींची प्रत्यक्ष माहिती घेतली. विशेष म्हणजे, पऱ्हाटी शेतात काम करणाऱ्या कापूस उत्पादक महिला शेतमजुरांशी संवाद साधण्यासाठी पथकाने ताफा थांबविला. महिलांची आस्थेवाईकपणे विचारपूस करून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. दुष्काळाचा परिणाम पिकांसोबतच मजुरांच्या रोजगारावर आणि कुटुंबांच्या जगण्यावरही होत असल्याची जाणीव या संवादातून अधोरेखित झाली.

आकडेवारीपासून प्रत्यक्ष वास्तवापर्यंत…

केंद्रीय आंतरमंत्रालयीन पथकाचे नेतृत्व कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संयुक्त सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मुक्तानंद अग्रवाल यांनी केले. पथकात महालनोबिस राष्ट्रीय पीक पूर्वानुमान केंद्राचे उपसंचालक सुनील कुमार दुबे, नीती आयोगाचे सल्लागार डॉ. जसपाल सिंग आणि पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या पशुधन अधिकारी डॉ. साक्षी भदौरिया यांचा समावेश होता. राज्याचे कृषी सचिव परिमल सिंग हेही दौऱ्यात सहभागी होते.

गुरुवारी रात्री विभागीय आयुक्तालयात विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी पथकाला मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचे सविस्तर सादरीकरण केले. पर्जन्यमानातील तूट, खरीप पिकांची स्थिती, धरणांतील पाणीसाठा, भूजल पातळी, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, चारा आणि रोजगाराच्या प्रश्नांबाबतची माहिती यावेळी मांडण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. दूरदृश्यप्रणालीद्वारे विभागातील आठही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी सहभागी झाले होते.

विभागातील आठ जिल्ह्यांतील ७६ तालुक्यांमध्ये खरीप पेरणीचे क्षेत्र सुमारे ५२ लाख हेक्टर असून पावसाच्या दीर्घ खंडामुळे पिकांच्या वाढीवर आणि संभाव्य उत्पादनावर गंभीर परिणाम झाल्याचे सादरीकरणात स्पष्ट करण्यात आले. विभागातील धरणांमधील पाणीसाठा ३०.७ टक्क्यांवर आला आहे. जालना, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांत भूजल पातळी मागील पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा चार ते पाच मीटरने खाली गेली आहे. विभागातील १९० गावे आणि १५७ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून ६०३ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. टंचाई निवारण, चारा उपलब्धता आणि रोजगार हमीच्या उपाययोजनांची माहितीही पथकाला देण्यात आली. या माहितीची प्रत्यक्ष पडताळणी करून परिस्थितीचा अहवाल शासनाला सादर करण्यात येईल, असे पथकप्रमुख मुक्तानंद अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

देमनीत करपलेल्या सोयाबीनमागची वेदना

शुक्रवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देमनी शिवारात केंद्रीय पथकाने शेतकरी विकास देविदास शिंदे यांच्या गट क्रमांक ८४ मधील १ हेक्टर २० आर क्षेत्रावरील करपलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. मशागत, बियाणे, खते आणि मजुरीसाठी केलेला खर्च पावसाअभावी वाया गेल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मांडली. पिकाच्या उत्पन्नावर घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि कर्जफेडीची गणिते अवलंबून असतात. पीक हातचे गेल्याने या सर्व अपेक्षांवर पाणी फिरते, याची जाणीव या पाहणीतून झाली.

पथकाने विलास देविदास शिंदे यांच्यासह परिसरातील अन्य शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीचे स्वरूप आणि पुढील काळातील अडचणी जाणून घेतल्या. 

जालन्यात नाणेगावपासून गल्हाटीपर्यंत पाहणी

केंद्रीय पथकाने जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील नाणेगाव तसेच अंबड तालुक्यातील किणगाववाडी आणि जामखेड परिसरातील शेतशिवारांची पाहणी केली. या दौऱ्यात आमदार नारायण कुचे, राज्याचे कृषी सचिव परिमल सिंग, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल उपस्थित होते.

बदनापूर तालुक्यातील नाणेगाव येथे शेतकरी शिवाजी डोंगरे यांच्या शेतातील करपलेल्या सोयाबीन पिकाची,अंबड तालुक्यातील किणगाववाडी येथे उदल हरीचंद शिहिरे यांच्या शेतातील करपलेली मोसंबीची झाडे आणि कोरडे पडलेले शेततळे पाहण्यात आले. याच परिसरात शिवलाल गांगे यांच्या शेतातील अदरक पिकाची, तर बालचंद गांगे यांच्या शेतातील कापूस पिकाची पाहणी करण्यात आली. जामखेड येथे संतोष गुरुके यांच्या शेतातील बाजरी पिकाची आणि गणेश जुंजार यांच्या शेतातील कोरड्या विहिरीची पाहणी करून पाण्याच्या उपलब्धतेची माहिती घेण्यात आली.

अंबड तालुक्यातील कोरड्या पडलेल्या गल्हाटी मध्यम प्रकल्पाचीही पथकाने पाहणी केली. प्रकल्पावर अवलंबून असलेल्या गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न, सिंचनासाठी घटलेली पाण्याची उपलब्धता आणि मच्छीमारीवर उपजीविका करणाऱ्या १०६ कुटुंबांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. प्रकल्प परिसरातील उत्तमराव साळुंके यांच्या शेतातील कापूस पिकासह अन्य शेतांतील ऊस पिकांचीही पाहणी करण्यात आली. पाण्याअभावी फळबागा आणि खरीप पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांनी वाढता उत्पादन खर्च आणि उत्पन्नाबाबतची अनिश्चितता पथकासमोर मांडली.

बीडमध्ये कपाशी, ऊस ,सोयाबीनची पाहणी

जालना जिल्ह्यातील पाहणीनंतर केंद्रीय पथकाने बीड जिल्ह्यातील गेवराई आणि बीड तालुक्यांतील दुष्काळग्रस्त भागांचा दौरा केला. या वेळी आमदार विजयसिंह पंडित, राज्याचे कृषी सचिव परिमल सिंग, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहमान आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे उपस्थित होते.

गेवराई तालुक्यातील जातेगाव फाटा परिसरातील पाहणीनंतर अर्धमसला आणि रानमळा परिसरातील पिकांची स्थिती जाणून घेण्यात आली. अर्धमसला येथील शेतकरी सुरेश बाबुराव नरवाडे यांच्या गट क्रमांक ९४ मधील १.४० हेक्टर क्षेत्रावरील कपाशी पिकाची, तर संतोष बाबुराव नरवाडे यांच्या गट क्रमांक ३३१ मधील ०.६७ हेक्टर क्षेत्रावरील ऊस पिकाची पाहणी करण्यात आली. गेवराई येथील मदन रामभाऊ मोटे यांच्या ०.८० हेक्टर क्षेत्रावरील कपाशी पिकाच्या नुकसानीचीही माहिती घेण्यात आली.

पावसाच्या दीर्घ खंडामुळे कपाशी, ऊस आणि तुती पिकांवर परिणाम झाला आहे. तुतीची वाढ खुंटल्याने अपेक्षित उत्पादनाबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून करपलेल्या पिकांचा जनावरांसाठी चारा म्हणूनही उपयोग होत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मदन रामभाऊ मोटे यांच्या तूर आणि कपाशी पिकांची पाहणी करताना जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस नसल्यामुळे झालेल्या नुकसानीची माहिती पथकाने घेतली. विहिरीतील पाणी आटल्याने पिण्याच्या पाण्यासाठी स्वखर्चाने टँकर मागवावा लागत असल्याची व्यथा त्यांनी मांडली. परिसरातील अन्य शेतकऱ्यांनीही ऊस पीक जळून गेल्याचे सांगितले.

बीड तालुक्यातील पारगाव जप्ती येथे शेतकरी सतीश सखाराम देवळे यांच्या गट क्रमांक ५० मधील ०.४० हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाची पाहणी करण्यात आली. त्यानंतर नांदुरा हवेली येथे सिंदफणा नदीच्या कोरड्या पात्राची पाहणी करून परिसरातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यात आला. माजलगाव धरणातील पाणीसाठा सरासरीच्या २६ टक्क्यांपर्यंत घसरल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पावसाचे पाणी अडविण्यासाठी बंधारे उभारणे, भूजल पुनर्भरण वाढविणे आणि गाळ साचलेल्या विहिरींचे पुनरुज्जीवन करणे, अशा उपाययोजनांची आवश्यकता स्थानिकांनी मांडली.

प्रशासनाच्या उपाययोजना; शेतकऱ्यांना अपेक्षा

दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्याचे नियोजन, टँकरद्वारे पुरवठा, आवश्यकतेनुसार विहिरींचे अधिग्रहण, चारा उपलब्धता आणि रोजगार हमीच्या कामांचे नियोजन करण्यात येत आहे. विभागीय आयुक्तालयातील बैठकीत या उपाययोजनांची माहिती केंद्रीय पथकाला देण्यात आली. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी पीक नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे, नुकसानभरपाई, आर्थिक मदत आणि पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

विभागीय आयुक्तालयातील सादरीकरणापासून सुरू झालेला आणि दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजेपर्यंत चाललेला हा दौरा दुष्काळाच्या विविध पैलूंची प्रत्यक्ष पडताळणी करणारा ठरला.

करपलेली पिके, कोरड्या विहिरी, घटलेले जलस्रोत आणि रोजगाराची अनिश्चितता यातून शेतकरी व शेतमजुरांसमोरील आव्हाने स्पष्ट झाली. विशेषतः महिला शेतमजुरांशी संवाद साधण्यासाठी ताफा थांबविण्याच्या प्रसंगातून दुष्काळाच्या परिणामांकडे मानवी आणि सामाजिक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज अधोरेखित झाली.

केंद्रीय पथक प्रत्यक्ष पाहणी आणि संबंधित विभागांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे परिस्थितीचा अहवाल शासनाला सादर करणार आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून त्यांचे प्रश्न ऐकणे, नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करणे आणि पाणीटंचाईपासून उपजीविकेपर्यंतच्या अडचणी समजून घेणे, हा मदतीच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आहे. दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि आवश्यक उपाययोजनांना दिशा मिळावी, या दृष्टीने केंद्रीय पथकाचा हा दौरा महत्त्वाचा ठरला.

***

















वृत्त क्रमांक

वॉटर फिल्टर प्लांटमधील पाण्याचा पुनर्वापर करा

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे वॉटर प्लांट चालकांना आवाहन

• प्लांटचे सर्वेक्षण करून माहिती सादर करण्याचे निर्देश

नांदेड (जिमाका), दि. 09 : अल्-निनोचा संभाव्य प्रभाव आणि दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा अपव्यय टाळून उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. यासाठी वॉटर फिल्टर प्लांटमधून प्रक्रियेदरम्यान वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करावा, तसेच हे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी आणि गरजू नागरिकांच्या दैनंदिन वापरासाठी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 8 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याचे उत्पादन व विक्री करणाऱ्या वॉटर असोसिएशनच्या सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत पाण्याचा अपव्यय रोखणे आणि त्याच्या पुनर्वापराच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

जिल्ह्यात एक लिटर पॅकेज्ड पाण्याचे उत्पादन करणाऱ्या युनिटची संख्या मर्यादित असून, त्यामध्ये वाया जाणाऱ्या पाण्याचे प्रमाणही कमी आहे. मात्र, 20 लिटरच्या फिल्टर पाण्याच्या जारची विक्री करणारे सुमारे 350 ते 400 युनिट जिल्ह्यात कार्यरत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

या पार्श्वभूमीवर नांदेड शहर आणि शहरालगतच्या परिसरातील सर्व परवानाधारक तसेच विनापरवानाधारक वॉटर फिल्टर प्लांटचे सर्वेक्षण करून त्यांची माहिती सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना दिले.

पाण्याच्या पुनर्वापरासाठी उपाययोजना करा

शोषखड्ड्यांद्वारे भूजल पुनर्भरण : वॉटर फिल्टर प्लांटमधून प्रक्रियेदरम्यान बाहेर पडणारे पाणी शोषखड्डे तयार करून जमिनीत मुरवावे. यामुळे भूजल पुनर्भरणास मदत होईल.

वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर : प्रक्रियेदरम्यान वाया जाणाऱ्या पाण्याचा इतर योग्य कामांसाठी जास्तीत जास्त पुनर्वापर करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे.

टंचाईच्या काळात दैनंदिन वापरासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे : वाया जाणारे पाणी मोठ्या टाकीत साठवून ठेवावे. पाण्याच्या गुणवत्तेनुसार आणि योग्य वापरासाठी आवश्यक खबरदारी घेऊन हे पाणी परिसरातील गरजू नागरिकांना कपडे धुणे, भांडी घासणे, स्वच्छता आदी कामांसाठी उपलब्ध करून द्यावे. यामुळे पाणीटंचाईच्या काळात नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.

पाणी बचतीसाठी सामाजिक जबाबदारी पार पाडा

आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे, प्रक्रियेदरम्यान होणारा अपव्यय रोखणे आणि वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व परवानाधारक व विनापरवानाधारक वॉटर प्लांट चालक तसेच विक्रेत्यांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून पाणी बचतीसाठी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

***

वृत्त क्रमांक

सैनिकी मुलांच्या वसतिगृहासाठी किराणा साहित्य पुरवठादारांनी  15 ऑक्टोबरपर्यंत दरपत्रके सादर करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका), दि. 9 : विष्णुपुरी, झरी रोड, नांदेड येथील सैनिकी मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या भोजन व्यवस्थेसाठी आवश्यक असलेल्या किराणा साहित्याचा नियमित पुरवठा करण्यासाठी पुरवठादारांकडून दरपत्रके मागविण्यात आली आहेत. 

या वसतिगृहाची क्षमता 50 विद्यार्थ्यांची असून, येथे सैनिकांच्या मुलांच्या निवासासह भोजनाची व्यवस्था करण्यात येते. वसतिगृहाच्या भोजनगृहासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या किराणा साहित्याचे दरपत्रक पुरवठादारांनी बंद लिफाफ्यातून सादर करावे.

इच्छुक पुरवठादारांनी किराणा साहित्याच्या यादीप्रमाणे प्रत्येक वस्तूचे दर किलो, ग्रॅम अथवा तोळा या योग्य परिमाणानुसार नमूद करून आपली दरपत्रके 15 ऑक्टोबर 2026 पर्यंत सैनिकी मुलांचे वसतिगृह, विष्णुपुरी, झरी रोड, नांदेड येथे सादर करावीत. किराणा साहित्याची सविस्तर यादी वसतिगृहात उपलब्ध आहे.

निर्धारित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या दरपत्रकांचा विचार केला जाणार नाही. प्राप्त झालेली दरपत्रके 15 ऑक्टोबर 2026 रोजी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, नांदेड यांच्या समक्ष उघडण्यात येतील. कोणतेही दरपत्रक स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार संबंधित कार्यालयाने राखून ठेवला आहे. 

अधिक माहितीसाठी इच्छुक पुरवठादारांनी 8380873985 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सैनिकी मुलांचे वसतिगृहाच्या अधीक्षकांनी केले आहे.

***

वृत्त क्रमांक

चारा साक्षरतेतून चारा टंचाईवर मात करा

• सोमठाणा येथे शेतकरी व पशुपालकांना शास्त्रीय चारा व्यवस्थापनाचे मार्गदर्शन

• निकृष्ट चारा सकस करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर

• हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानातून पर्यायी चारा उत्पादन

नांदेड(जिमाका), दि. 9 : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि संभाव्य चारा टंचाई लक्षात घेता उपलब्ध चाऱ्याचा कार्यक्षम वापर करून पशुधनाला सकस व पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाभर ‘चारा साक्षरता अभियान’ राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत भोकर तालुक्यातील सोमठाणा येथे शेतकरी व पशुपालकांसाठी चारा व्यवस्थापन आणि पशुपोषणविषयक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

दुष्काळी परिस्थितीत हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी झाल्यास ज्वारीचा कडबा, गव्हाचे काड आणि अन्य कोरड्या चाऱ्याचा वापर वाढतो. अशा चाऱ्याची पाचकता व पोषणमूल्य तुलनेने कमी असल्याने पशुधनाच्या आरोग्यावर आणि दूध उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. यावर उपाय म्हणून योग्य कोरड्या चाऱ्यावर युरिया-मोलासेस प्रक्रिया करण्याच्या तंत्रज्ञानाची माहिती शेतकरी व पशुपालकांना देण्यात आली. या प्रक्रियेमुळे चाऱ्याची पाचकता सुधारण्यास आणि मोलासेसच्या वापरामुळे रुचकरता वाढण्यास मदत होते. ही प्रक्रिया तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य प्रमाणात व सुरक्षित पद्धतीने करणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

चारा उत्पादनासाठी जमीन आणि पाण्याची उपलब्धता मर्यादित असताना कमी जागेत नियंत्रित पाणीवापरातून अंकुरित हिरवा चारा तयार करण्यासाठी हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते. या तंत्रज्ञानाची माहिती देताना हा चारा संतुलित पशुआहाराचा पूरक घटक असल्याचे सांगण्यात आले. हिरवा चारा, वाळलेला चारा, संतुलित पशुखाद्य आणि खनिज मिश्रण यांचा जनावरांच्या गरजेनुसार योग्य समतोल राखण्याचे आवाहन करण्यात आले.

उपलब्ध चाऱ्याचा जास्तीत जास्त उपयोग करण्यासाठी कडबाकुट्टी यंत्राचा वापर, हिरव्या चाऱ्यापासून मुरघास निर्मिती, कोरड्या चाऱ्याची योग्य साठवणूक आणि पशुधनाच्या गरजेनुसार संतुलित आहाराचे नियोजन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. केवळ चारा उत्पादन वाढविणे पुरेसे नसून उपलब्ध चाऱ्याचे पोषणमूल्य वाढविणे, त्याची नासाडी टाळणे आणि साठवणुकीचे योग्य नियोजन करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले. 

या कार्यक्रमास जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. सखाराम खुणे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. प्रविणकुमार घुले, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश बुन्नावार, डॉ. दीक्षाली मोरे, डॉ. उमेश सोनटक्के तसेच पशुधन पर्यवेक्षक केदार देशमुख, रविकुमार बबिलवाड आणि विजय विभुते उपस्थित होते.

जिल्ह्यातील प्रत्येक गावापर्यंत चारा साक्षरता अभियान पोहोचवून शेतकरी व पशुपालकांना आधुनिक, शास्त्रीय आणि किफायतशीर चारा व्यवस्थापन तंत्रज्ञानाची माहिती देण्यावर भर देण्यात येत आहे. उपलब्ध चाऱ्याचा कार्यक्षम वापर, योग्य साठवणूक आणि संतुलित पशुआहाराच्या माध्यमातून दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचे आरोग्य व उत्पादनक्षमता टिकविण्याचे आवाहन या कार्यक्रमातून करण्यात आले.

**






वृत्त क्रमांक

स्वाधार योजनेच्या नूतनीकरण अर्जासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

• पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज व कागदपत्रे तातडीने सादर करावीत

• मागील वर्षांच्या पात्र विद्यार्थ्यांनी दुसऱ्या हप्त्यासाठी विवरणपत्र भरावे

नांदेड(जिमाका), दि. 9: अनुसूचित जातीतील पात्र विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या सन 2026-27 या शैक्षणिक वर्षातील नूतनीकरण अर्ज सादर करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज ऑनलाइन सादर करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

अनुसूचित जातीतील 50 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या आणि समाजकल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबविण्यात येते. जिल्हा व तालुका स्तरावर राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा लाभ महानगरपालिका क्षेत्रापासून पाच किलोमीटरच्या आतील तसेच नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत आणि तालुक्याच्या हद्दीतील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांना नियमानुसार मिळू शकतो.

सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी नूतनीकरण अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर आपल्या वापरकर्ता नाव व परवलीचा शब्दाच्या साहाय्याने प्रवेश करून नूतनीकरणाचा अर्ज आवश्यक कागदपत्रांसह पूर्ण भरावा. अर्जातील त्रुटी असल्यास त्या दूर करून संबंधित कागदपत्रे सादर करावीत. अर्जाची सद्यस्थिती विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर नियमितपणे तपासावी. मुदत संपल्यानंतर नूतनीकरण अर्ज सादर करता येणार नसल्याने विद्यार्थ्यांनी विलंब न करता कार्यवाही करावी. यासंदर्भातील सूचना विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावर तसेच ई-मेलवर पाठविण्यात आल्या आहेत.

सन 2024-25 आणि 2025-26 या शैक्षणिक वर्षांत स्वाधार योजनेसाठी पात्र ठरलेल्या आणि पहिला हप्ता प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या हप्त्याच्या अनुषंगाने ऑनलाइन ‘बी स्टेटमेंट’ (B Statement) लवकरात लवकर भरावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

नूतनीकरण अर्जाची प्रत संबंधित महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या समान संधी केंद्रात जमा करावी. योजनेसंदर्भातील अधिकृत माहिती, अर्जातील त्रुटी आणि शंकांचे निरसन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी समाजकल्याण विभागाच्या अधिकृत ‘samajkalyannanded’ या समाजमाध्यम खात्यावरील माहिती पाहावी. तसेच विभागाने तयार केलेल्या अधिकृत व्हॉट्सॲप गटांमध्ये सहभागी व्हावे. अनधिकृत व्यक्ती किंवा गटांकडून माहिती घेण्याऐवजी थेट समाजकल्याण कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून आपल्या अडचणींचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे. 

***

वृत्त क्रमांक

अंड्याच्या पोषणमूल्यांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

• जागतिक अंडी दिनानिमित्त सोमठाणा येथे पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम

• अंड्याचे पोषणमूल्य आणि संतुलित आहाराचे महत्त्व पटवून दिले

नांदेड (जिमाका), दि. 9: विद्यार्थ्यांचा शारीरिक व बौद्धिक विकास साधण्यासाठी पौष्टिक आहार आणि आरोग्यदायी सवयी महत्त्वाच्या आहेत. या अनुषंगाने जागतिक अंडी दिनानिमित्त पशुसंवर्धन विभागाच्या वतीने भोकर तालुक्यातील सोमठाणा येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी पोषणविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांना अंड्याचे पोषणमूल्य, आरोग्यविषयक फायदे आणि संतुलित आहाराचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

जागतिक अंडी दिन दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी साजरा केला जातो. अंड्याचे मानवी आहारातील महत्त्व आणि त्यातील पोषक घटकांविषयी जनजागृती करणे हा या दिवसाचा प्रमुख उद्देश आहे. ‘सुदृढ आरोग्यासाठी पौष्टिक आहार, पौष्टिक आहारात अंड्याला महत्त्वाचे स्थान’ हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

या कार्यक्रमास जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. सखाराम खुणे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. प्रवीणकुमार घुले, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश बुन्नावार, डॉ. दीक्षाली मोरे, डॉ. उमेश सोनटक्के तसेच पशुधन पर्यवेक्षक केदार देशमुख, रविकुमार बबिलवाड आणि विजय विभुते उपस्थित होते.

अंड्यामध्ये उच्च दर्जाची प्रथिने, जीवनसत्त्वे आणि विविध खनिजे असतात. वाढत्या वयातील मुलांची शारीरिक वाढ, स्नायूंचा विकास आणि मेंदूचे कार्य यांसाठी पोषक आहार आवश्यक आहे. संतुलित आहाराचा भाग म्हणून अंड्याचा समावेश उपयुक्त ठरू शकतो, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.

विद्यार्थ्यांना अंडी योग्य प्रकारे शिजवून खाणे, अन्नाची स्वच्छता राखणे, सुरक्षित अन्नसेवन करणे आणि नियमित संतुलित आहार घेणे याबाबतही माहिती देण्यात आली. बालवयापासून आरोग्यदायी आहाराच्या सवयी विकसित केल्यास मुलांच्या सर्वांगीण विकासाला मदत होते, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

पशुसंवर्धन विभागाच्यावतीने पशुधन विकास, दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालनाला प्रोत्साहन देण्यासोबतच दूध व अंडी यांसारख्या पशुजन्य अन्नपदार्थांचे पोषणातील महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून सोमठाणा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

***




 वृत्त क्रमांक

गीर गोवंश संवर्धनातून आधुनिक दुग्धव्यवसायाचा आदर्श निर्माण करा

• भोकर येथील ‘अथर्व डेअरी’ची पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

• शास्त्रीय संगोपन व चारा व्यवस्थापनाचे केले कौतुक

नांदेड(जिमाका),दि. 9: आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रीय पशुसंगोपन आणि नियोजनबद्ध व्यवस्थापनाच्या माध्यमातून दुग्धव्यवसाय अधिक उत्पादनक्षम व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर करण्यासाठी प्रगतिशील पशुपालकांचे प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरत आहेत. या अनुषंगाने भोकर येथील प्रगतिशील पशुपालक चंद्रकांत भगवानराव चिंचाळकर यांच्या गीर गोवंश संगोपनावर आधारित ‘अथर्व डेअरी’ या दुग्धव्यवसाय प्रक्षेत्राची आज पाहणी करण्यात आली.

या वेळी जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. सखाराम खुणे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. प्रविणकुमार घुले, भोकरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश बुन्नावार उपस्थित होते.

अथर्व डेअरी प्रक्षेत्रावर गुजरात राज्यातून निवडक पद्धतीने खरेदी केलेल्या गीर गोवंशाचे संगोपन करण्यात येत आहे. गीर ही देशी गोवंशातील महत्त्वाची दुग्धोत्पादक जात असून दूध उत्पादनक्षमता, स्थानिक हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता आणि आनुवंशिक वैशिष्ट्यांमुळे या जातीला विशेष महत्त्व आहे. उत्कृष्ट आनुवंशिक गुणधर्म असलेल्या गोवंशाची निवड करून त्यांचे शास्त्रीय पद्धतीने संगोपन करण्याचा चिंचाळकर यांचा प्रयत्न उल्लेखनीय आहे.

पाहणीदरम्यान गोठ्याची रचना, जनावरांच्या मुक्त हालचालीची व्यवस्था, पशुधनाचे आरोग्य आणि चारा व्यवस्थापनाची माहिती घेण्यात आली. प्रक्षेत्रावर मुक्त संचार गोठा पद्धतीचा अवलंब करण्यात आला असून, त्यामुळे जनावरांना मुक्तपणे हालचाल करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होते. तसेच हिरवा व वाळलेला चारा यांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यात आले आहे. जनावरांच्या पोषणविषयक गरजा लक्षात घेऊन चाऱ्याचा कार्यक्षम वापर करण्यावर भर दिल्याचे दिसून आले.

गीर गोवंशाचे संवर्धन आणि उत्कृष्ट आनुवंशिक गुणधर्म पुढील पिढीत संक्रमित करण्यासाठी चिंचाळकर यांनी भविष्यात भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे नियोजन केले आहे. या तंत्रज्ञानाचा योग्य पशुवैद्यकीय मार्गदर्शनाखाली वापर केल्यास उच्च आनुवंशिक गुणवत्तेच्या गोवंशाची पैदास वाढविण्यास आणि दुग्धोत्पादन क्षमता सुधारण्यास मदत होऊ शकते.

पारंपरिक दुग्धव्यवसायाला आधुनिक पशुसंगोपन पद्धतीची जोड देत गीर गोवंश संवर्धन, मुक्त संचार गोठा पद्धती, नियोजनबद्ध चारा व्यवस्थापन आणि आधुनिक प्रजनन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या दिशेने चिंचाळकर यांनी केलेले प्रयत्न प्रेरणादायी आहेत. जिल्ह्यातील इतर शेतकरी व पशुपालकांनीही शास्त्रीय पशुसंगोपन, गुणवत्तापूर्ण गोवंशाची निवड आणि आधुनिक व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करावा. यामुळे दुग्धव्यवसाय अधिक शाश्वत, उत्पादनक्षम व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यास मदत होणार आहे.

**




वृत्त  

केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी

छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय  पथकाने आज देमनी शिवारात पाहणी केली.

देमनी येथील शेतकरी विलास देविदास शिंदे यांच्या गट ८४ मधील १ हे २० आर क्षेत्रात सोयाबीन पिकाची लागवड होती. पावसा अभावी पूर्ण पीक करपून गेले आहे. यावेळी पथकाने शेतकऱ्यांशी संवाद साधून सर्व स्थिती जाणून घेतली. 

कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संयुक्त सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मुक्तानंद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकात महालनोबिस राष्ट्रीय पीक पूर्वानुमान केंद्राचे उपसंचालक सुनील कुमार दुबे, नीती आयोगाचे सल्लागार डॉ. जसपाल सिंग, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या पशुधन अधिकारी डॉ. साक्षी भदौरिया यांचा समावेश आहे.  राज्याचे कृषी विभागाचे सचिव परिमल सिंग जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. हे तसेच स्थानिक प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

00000














दुष्काळग्रस्तांना वेळेत मदत मिळावी, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करण्यात येत आहे. पाणी, चारा व रोजगार हमीच्या कामांचा आढावा घेऊन केंद्रीय पथकाकडून प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे. वस्तुनिष्ठ अहवालाच्या आधारे दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन केले जाणार आहे.

#दुष्काळनिवारण #शेतकरीहित #DroughtRelief #MaharashtraGovt #ChhatrapatiSambhajinagar

दुष्काळग्रस्तांना वेळेत मदत मिळावी, यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजनांना गती द्यावी. पाणी, चारा व रोजगार हमीच्या कामांची पुराव्यांसह माहिती सादर करण्याचे निर्देश केंद्रीय पथकाने दिले. प्रत्यक्ष पडताळणीनंतर दुष्काळी परिस्थितीचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यात येणार आहे.

#दुष्काळनिवारण #शेतकरीहित #DroughtRelief #MaharashtraGovt #ChhatrapatiSambhajinagar



वृत्त  

केंद्रीय पथकाला विभागीय आयुक्तांकडून दुष्काळी परिस्थितीचे सविस्तर सादरीकरण

पावसाची ३५ टक्के तूट; धरणसाठा ३०.७ टक्क्यांवर, पिके व पिण्याच्या पाण्यावर संकट

माहितीची प्रत्यक्ष पडताळणी करून अहवाल सादर करणार – मुक्तानंद अग्रवाल

छत्रपती संभाजीनगर, दि. ८ : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्र शासनाच्या केंद्रीय पथकाला विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी आज विभागीय आयुक्तालयात विभागातील दुष्काळी परिस्थितीचे सविस्तर सादरीकरण केले. यावेळी पर्जन्यमान, पावसातील खंड, खरीप पिकांची स्थिती, पिकांचे नुकसान, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, धरणांतील पाणीसाठा, चारा तसेच उपग्रहाधारित पीक स्थिती निर्देशांकांची माहिती पथकासमोर मांडण्यात आली.

कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संयुक्त सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मुक्तानंद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकात महालनोबिस राष्ट्रीय पीक पूर्वानुमान केंद्राचे उपसंचालक सुनील कुमार दुबे, नीती आयोगाचे सल्लागार डॉ. जसपाल सिंग, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या पशुधन अधिकारी डॉ. साक्षी भदौरिया यांचा समावेश आहे. याप्रसंगी राज्याच्या कृषी विभागाचे सचिव परिमल सिंग हेही उपस्थित होते.

८ जिल्हे, ७६ तालुक्यांमध्ये पावसाची तूट

छत्रपती संभाजीनगर विभागात ८ जिल्हे व ७६ तालुके असून, खरीप हंगामातील पेरणी जवळपास १०० टक्के म्हणजे सुमारे ५२ लाख हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. मात्र, रब्बी हंगामाची पेरणी आतापर्यंत केवळ ६ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर झाली आहे.

विभागात सरासरीच्या तुलनेत सुमारे ३५ टक्के पावसाची तूट असून, आतापर्यंत सरासरीच्या ६५.३५ टक्के पाऊस झाला आहे. जूनमध्ये समाधानकारक पाऊस झाल्यानंतर जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण घटले. विशेषतः ऑगस्टमधील दीर्घ पावसाच्या खंडाचा पिकांवर परिणाम झाला. विभागातील ४९६ महसूल मंडळांपैकी ३७ मंडळांत ३० दिवसांपेक्षा अधिक, तर १५५ मंडळांत २१ ते ३० दिवसांचा पावसाचा खंड नोंदविण्यात आला आहे.

सोयाबीन, कापूस पिकांवर परिणाम

एकूण खरीप पेरणी क्षेत्रापैकी सुमारे ५६ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली आहे. पावसाअभावी कापसाची वाढ खुंटून पाते व फुले गळण्याचे प्रमाण वाढले असून, किडींचाही प्रादुर्भाव दिसून आला आहे. सोयाबीनच्या शेंगांमध्ये दाणे भरण्याचे प्रमाण कमी झाले असून, मका, बाजरी व उडीद या पिकांवरही परिणाम झाला आहे. जालना जिल्ह्यातील पीक कापणी प्रयोगांतून उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याचे निदर्शनास आले.

धरणांतील पाणीसाठा ३०.७ टक्के

विभागातील धरणांमध्ये सध्या केवळ ३०.७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी पाणीसाठा राखून ठेवण्याची आवश्यकता असल्याने यंदाच्या रब्बी हंगामातील पेरणीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. नांदेड व हिंगोली वगळता जालना, धाराशिव व लातूर जिल्ह्यांमध्ये भूजल पातळी मागील पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा ४ ते ५ मीटरने खाली गेल्याची माहिती देण्यात आली.

पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेता, पावसाची २० टक्क्यांपेक्षा अधिक तूट व भूजल पातळीत ३ मीटरपेक्षा अधिक घट झालेल्या भागांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. सध्या १९० गावे व १५७ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, ६०३ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. संभाव्य टंचाईसाठी ५ हजार १३६ टँकर व ६ हजार ९६० विहिरींचे नियोजन करण्यात आले आहे.

पशुधनासाठी सध्या १२१ दिवसांचा चारा उपलब्ध असून, संभाव्य चाराटंचाईच्या पार्श्वभूमीवर चारा छावण्या सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

उपग्रहाधारित निर्देशांकांतून दुष्काळाच्या तीव्रतेचे मूल्यांकन

पीक व पाण्याच्या स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी उपग्रहाधारित वनस्पती स्थिती निर्देशांक, पाण्याची उपलब्धता दर्शविणारा निर्देशांक आणि वनस्पती स्थिती निर्देशांक यांचाही आढावा घेण्यात आला. पाण्याची उपलब्धता दर्शविणाऱ्या निर्देशांकानुसार ३४ तालुके तीव्र व मध्यम श्रेणीत, तर वनस्पती स्थिती निर्देशांकानुसार १० तालुके तीव्र आणि ३४ तालुके मध्यम श्रेणीत असल्याचे सादरीकरणात नमूद करण्यात आले.

पिके वरून हिरवी दिसत असली तरी पावसातील दीर्घ खंडामुळे प्रत्यक्ष वाढ व उत्पादनक्षमतेवर परिणाम झाल्याचे या निर्देशांकांच्या आधारे निदर्शनास आणून देण्यात आले.

विभागातील सुमारे ४० लाख शेतकऱ्यांपैकी ६५ टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा नोंदणी केली असून, पीक परिस्थिती व नुकसानीची माहिती पीक विम्याच्या लाभासाठी उपयुक्त ठरणार आहे.

माहितीची प्रत्यक्ष पडताळणी करून अहवाल सादर करणार

बैठकीच्या शेवटी केंद्रीय पथकाचे प्रमुख तथा कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संयुक्त सचिव मुक्तानंद अग्रवाल यांनी राज्याकडून सादर करण्यात आलेल्या माहितीची प्रत्यक्ष पडताळणी करून त्याआधारे अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले. दुष्काळाची सद्यस्थिती, उपलब्ध पाणीसाठा, पिकांचे नुकसान तसेच भविष्यातील पाणी व चाऱ्याची गरज यांचा समावेश असलेला सर्वंकष, अचूक व वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच चारा छावण्या, पिण्याचे पाणी आणि रोजगार हमीच्या कामांबाबतची माहिती आवश्यक पुराव्यांसह सादर करून दुष्काळग्रस्त गावांना वेळेत मदत मिळण्यासाठी कार्यवाही करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी विभागीय आयुक्तालयात जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., सहआयुक्त (महसूल) रिता मेत्रेवार, कृषी सहसंचालक सुनिल वानखेडे, पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त, भूवैज्ञानिक सोहम दळवी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. दूरदृश्यप्रणालीद्वारे विभागातील आठही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी सहभागी झाले होते.

केंद्रीय पथकाकडून दि. ९ व १० ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे. या पाहणीत शेतकरी, स्थानिक अधिकारी व संबंधित विभागांकडून पीक नुकसान, पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीबाबत प्रत्यक्ष माहिती घेतली जाणार आहे.

**






वृत्त  

मराठवाड्यात केंद्रीय पत्रकाचे आगमन 

 विभागीय आयुक्तांकडून दुष्काळी परिस्थितीचे सादरीकरण 

छत्रपती संभाजीनगर, दि. ८ : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्र शासनाच्या आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथकाला विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी आज विभागीय आयुक्तालयात विभागातील दुष्काळी परिस्थितीबाबत सविस्तर सादरीकरण केले. यावेळी पर्जन्यमान, पीक परिस्थिती, पिकांचे नुकसान, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता तसेच जनावरांच्या चाऱ्याची सद्यस्थिती याबाबत पथकाला माहिती देण्यात आली.

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी मुक्तानंद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील पथकात एमएनसीएफसीचे उपसंचालक सुनील कुमार दुबे, नीती आयोगाचे सल्लागार (ग्रेड-II) डॉ. जसपाल सिंग आणि पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या पशुधन अधिकारी डॉ. साक्षी भदौरिया, कृषी मंत्रालय अंतर्गत काम करणाऱ्या  पीक अंदाज केंद्राचे (एमएनसीएफसी ) उपसंचालक डॉ. सुनील कुमार दुबे, राज्याचे कृषी विभागाचे सचिव श्री.परिमलसिंग यांचा समावेश आहे.

विभागातील दुष्काळी परिस्थिती, कमी पर्जन्यमानामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई, खरीप पिकांवरील परिणाम तसेच दुष्काळाच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजनांबाबत विभागीय आयुक्तांनी पथकाला माहिती दिली. केंद्रीय पथकाने विभागातील विविध जिल्ह्यांतील परिस्थितीची माहिती जाणून घेत प्रत्यक्ष पाहणीचे उद्या व परवा नियोजन केले.

केंद्रीय पथकाकडून दि. ९ व १० ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे. यावेळी शेतकरी, स्थानिक अधिकारी आणि संबंधित विभागांकडून पीक नुकसान, पाणीटंचाई व दुष्काळी परिस्थितीबाबत माहिती घेतली जाणार आहे. आज आढावा बैठकीला विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या समवेत जिल्हाधिकारी जी. सी. गौडा यांची व अन्य अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.याशिवाय आठही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या आढावा बैठकीला दूरदृष्य प्रणालीव्दारे उपस्थित होते.

0000






केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...